सातारा : सातारा शहरात दहशत निर्माण करणाऱ्या बकासूर टोळीतील तिघांना खंडणीच्या गुन्ह्यात गजाआड करण्यात आले आहे. यामध्ये एकाला घरी भेटण्यास आल्यावर पकडले. तर दोघांना सारखळच्या डोंगरात पाठलाग करुन ताब्यात घेण्यात आले.आनंदा उर्फ आण्णा लक्ष्मण माने (वय १९, रा. जिव्हाळा काॅलनी, शाहूपुरी सातारा), विशाल राजेंद्र सावंत (रा. सदरबझार, सातारा. मूळ रा. टिटवेवाडी, ता. सातारा) आणि अर्जून रामदास साळुंखे (वय २०, रा. सारखळ, ता. सातारा. सध्या रा. दिव्यनगरी ) अशी त्यांची नावे आहेत.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि. ४ जून रोजी रात्री साडे आठच्या सुमारास शाहूपुरीतील भैरोबाचा पायथा येथे बकासूर टोळीतील आण्णा माने, आदित्य गोसावी, प्रेम पवार, अर्जून साळुंखे, विशाल सावंत आणि इतर दोन ते तीनजणांनी एकाला टोळीच्या विरोधात साक्ष दिली म्हणून आणि पूर्वीच्या केसमधील खर्चासाठी खंडणी मागितली होती. त्यावेळी संबंधिताला कोयत्याचा धाक दाखवून रोख रक्कम काढून घेतली होती. तर कोयता फिर्यादीच्या गाडीवर मारुन दशहत पसरविली होती. याप्रकरणी बकासूर टोळीच्या विरोधात शाहुपुरी पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा नोंद झाला होता.दरम्यान, या गुन्ह्यानंतर टोळीतील आण्णा माने, अर्जून साळुंखे, विशाल सावंत हे फरार झाले होते. त्यांचा शोध पोलिस पथक घेत हेाते. असे असतानाच १९ जून रोजी पथकाला आण्णा माने हा दिव्यनगरी (सातारा) येथील घरी भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी पहाटेपासूनच मानेच्या घराच्या परिसरात सापळा लावला होता. मात्र, माने दुपारच्या सुमारास घराच्या परिसरात येताच त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. तर दोघांना सारखळच्या डोंगरात शोध मोहीम राबवून पाठलाग करत ताब्यात घेतले. सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत बधे, हवालदार सुरेश घोडके, विजय कांबळे, नीलेश काटकर, महेश बनकर, अभय साबळे, सचिन पवार, स्वप्नील सावंत, स्वप्नील पवार, आणि सुमीत मोरे आदींनी कारवाईत सहभाग घेतला.
साताऱ्यात दहशत निर्माण करणाऱ्या बकासूर टोळीतील तिघांच्या मुसक्या आवळल्या
By नितीन काळेल | Published: June 22, 2023 12:45 PM