सातारा : सातारा पालिकेतील टक्केवारीचा पर्दाफाश केल्यानंतर लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी खंडाळा तालुक्यातील पारगाव येथील टक्केवारीचा पर्दाफाश केला. यामध्ये पारगावच्या ग्रामसेवकासह तिघांना ६० हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर जिल्ह्यातील लाचखोरी उफाळून आल्याचे यानिमित्ताने समोर येत आहे.भाऊसाहेब गजानन सस्ते (ग्रामसेवक, पारगाव खंडाळा), अंबादास रामराव जोळदापके, (खासगी ठेकेदार, रा. नांदेड सीटी, पुणे) गंगाराम बाबासाहेब भोसले (वय ४९, शाखा अभियंता, पंचायत समिती खंडाळा ) अशी लाचलुचपतच्या जाळ्यात अडकलेल्यांची नावे आहेत.याबाबत अधिक माहिती अशी, संबंधित तक्रारदाराने पारगाव, ता. खंडाळा येथील बंदिस्त गटाराचे काम केले होते. यासाठी त्यांनी डिपॉझिट ठेवले होते. हे झिपॉझिट आणि कामाचे बिल काढण्यासाठी ग्रामसेवक सस्ते याने स्वत:साठी ५ टक्के व शाखा अभियंता भोसले याच्यासाठी ५ टक्के असे एकूण १० टक्के प्रमाणे ६० हजार रुपयांची मागणी केली होती. त्यामुळे संबंधित तक्रारदाराने सातारा येथे येऊन लाचलुचपत विभागात लेखी तक्रार दिली. त्यानुसार एसीबीच्या टीमने बुधवार, दि. १० रोजी सायंकाळी जिल्हा परिषदेसमोर सापळा लावला.
ग्रामसेवक भाऊसाहेब सस्ते व शाखा अभियंता भोसले यांनी मोबाईलवरून खासगी ठेकेदार अंबादास जोळदापके (रा. नांदेड सीटी, पुणे) यांच्याकडे पैसे देण्यास तक्रारदाराला सांगितले. तक्रारदाराने ६० हजारांची रक्कम जोळदापके याच्याकडे दिल्यानंतर एसीबी टीमने तत्काळ झडप घालून दापकेला रंगेहाथ पकडले.
त्यानंतर ग्रामसेवक सस्ते आणि भोसले या दोघांनाही पकडण्यात आले. लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी सलग दुसऱ्या दिवशी ही कारवाई केली. या तिघांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.या कारवाईमध्ये पोलीस उपअधीक्षक अशोक शिर्के, पोलीस निरीक्षक अविनाश जगताप, सहायक फौजदार आनंदराव सपकाळ, हवालदार भरत शिंदे, विजय काटवटे, संजय साळुंखे, मारूती अडागळे, संजय अडसूळ, प्रशांत ताटे आदींनी भाग घेतला.