औंध : खटाव तालुक्यात सगळीकडे निवडणुकीची धामधूम सुरू असताना पुसेसावळी येथे गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत निवडणूक खर्च न देल्याप्रकरणी माजी उपसरपंच सुरेश उर्फ सूर्यकांत शंकरराव कदम यांच्यासह दोघांना पुढील पाच वर्षासाठी ग्रामपंचायत निवडणूक लढवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंध घातले आहेत,’ अशी माहिती अॅड. अभिजित वीर यांनी दिली.
औंध येथे आयोजित पत्रकार परिषदेत अॅड. वीर म्हणाले, ‘गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत सुरेश शंकरराव कदम, यांच्यासह सचिन उत्तम कदम, मंगल अर्जून कदम हे ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले होते.
सुरेश कदम हे उपसरपंच म्हणून कारभार पहात होते. मात्र निवडणुकीनंतर निवडून आलेल्या सदस्याने निवडणुकीच्या खर्चाचा तपशील विहीत नमुन्यात दिलेल्या वेळेत निवडणूक आयोगाला देणे बंधनकारक असते. मात्र तिघांनी वेळेत खर्चाचा तपशील निवडणूक आयोगाला दिला नाही. त्यामुळे त्यांच्या विरोधात श्रीकांत कदम आणि रवींद्र कदम यांनी अॅड. अभिजित वीर यांच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेऊन त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली होती.
अॅड. वीर यांनी याबाबत केलेला युक्तिवाद जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य करून तिघांना पाच वर्षे निवडणूक लढवण्यास निर्बंध घातले आहेत. ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत हा निकाल आल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यावेळी दादासाहेब कदम, नितीन वीर उपस्थित होते.