पाटण : पाटण तालुक्यामध्ये सर्वसामान्य जनतेला तातडीने आरोग्य सेवा मिळावी, यासाठी तेरा प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ६४ आरोग्य उपकेंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. परंतु येथे आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या कमी अन् ड्युटीवर असणाऱ्या डॉक्टरांची मनमानी यामुळे तालुक्यातील आरोग्य यंत्रणेचे तीनतेरा वाजले आहेत.
तालुका आरोग्य अधिकारी बरेच दिवस रजेवर आहेत.
त्याबाबत पाटण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी तसेच सभापती आणि सदस्यांनी नाराजी व्यक्त केली असून, काही आरोग्य केंद्रांना नोटिसादेखील दिल्या आहेत.
नुकत्याच झालेल्या पाटण पंचायत समितीच्या मासिक सभेत तालुक्यातील सळवे, मुरुड, केरळ या प्राथमिक आरोग्य केंद्रांत सावळागोंधळ असल्याची चर्चा करण्यात आली होती. इतकेच नव्हे, तर अनेकवेळा सांगूनही प्राथमिक आरोग्य केंद्रांचे डॉक्टर दवाखान्यात मुक्कामी राहात नाहीत. याबाबत एका महिन्यात सुधारणा नाही झाली तर कडक
भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा सभापतींसह सदस्यांनी दिला आहे. पाटण तालुक्यात ६४ आरोग्य उपकेंद्रे आहेत. त्यापैकी निम्म्याहून जास्त उपकेंद्रे कुलूपबंद असतात.
चौकट
दुर्गम गावांना आरोग्य सेवा कधी?
तालुक्यात पांढरेपाणी, निवी, कासानी, मळे, कोळणे, पाथरपुंज तसेच वनकुसवडे पठारावरील आणि चाफळ विभागातील अनेक दुर्गम गावे आहेत. या गावातील लोकांना तातडीची आरोग्यसेवा कधी मिळणार, याची शाश्वती नाही.
कोट
ज्या ठिकाणी डॉक्टर मुक्कामी राहात नाहीत, त्यांना नोटिसा बजावल्या आहेत. जिथे डॉक्टर्स हलगर्जीपणा करतील, त्या ठिकाणी कारवाई करण्यात येईल
- प्रमोद खराडे
प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी
कोट
नुकत्याच झालेल्या पंचायत समितीच्या मासिक सभेत प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टर राहिले पाहिजेत, हा विषय झाला; परंतु त्याची अजूनही अंमलबजावणी झालेली दिसत नाही. तसेच तालुक्यातील आरोग्य यंत्रणेची स्थिती सुधारली पाहिजे. याबाबत पुढील मासिक सभेत आवाज उठवणार आहे.
- संतोष गिरी,
पंचायत समिती सदस्य