सातारा : सातारा पालिकेच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेल्या मैला (सक्शन) गाडीचे शुक्रवारी प्रात्यक्षिक घेण्यात आले. मैला टाकी कशी उपसावी, टाकी उपसताना अडचणी आल्यास त्या कशा सोडवाव्यात, कर्मचारी व चालकांची कोणती खबरदारी घ्यावी आदींची इत्थंभूत माहिती आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात आली.
सातारा पालिका हद्दीतील सार्वजनिक व वैयक्तिक शौचालयांच्या स्वच्छतेकरिता सेफ्टिक टँक, रोटावेटर प्लीट, डोम ब्रश आणि मुबलक पाणीपुरवठ्याच्या क्षमतेसह तीन हजार लीटर क्षमतेची नवीन मैला गाडी पालिकेला उपलब्ध झाली आहे. शहराच्या हद्दीवाढीनंतर मूळच्या तेहतीस हजार मिळकतींमध्ये दुप्पटीने वाढ झाली आहे. म्हणूनच एचटी पारेखच्या सीएसआर निधीअंर्तगत पालिकेने पाठपुरावा केल्यानंतर सातारकरांना अद्ययावत मैला गाडी उपलब्ध झाली आहे. या गाडीची सर्व तांत्रिक माहिती चालक व आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रात्यक्षिकाद्वारे देण्यात आली.
शहरातील एका सार्वजनिक स्वच्छतागृहाची मैला टाकी उपसून प्रात्यक्षिक घेण्यात आले. यावेळी टाकी स्वच्छ करताना येणाऱ्या अडचणी, त्याची सोडवणूक कशी करावी, गाडी चालविताना घ्यावयाची काळजी आदींची माहिती कर्मचाऱ्यांना देण्यात आली. ही गाडी तीन हजार लीटर मैला केवळ दहा मिनिटांत उपसा करते. अनेक वर्षांपासून टाकी उपसली न गेल्यास मैला घट्ट होतो. अशा टाक्या स्वच्छ करण्यासाठी गाडीत मिक्सिंग करण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे कमी वेळात मैला उपसला जाऊ शकतो.
यावेळी आरोग्य विभागप्रमुख शैलेश अष्टेकर, आरोग्य निरीक्षक सागर बडेकर, वाहतूक विभागाचे प्रमुख सौरभ साळुंखे व मैला व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
फोटो : ०९ सातारा पालिका मैला गाडी
सातारा पालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना शुक्रवारी मैला गाडीची प्रात्यक्षिकाद्वारे माहिती देण्यात आली.