कऱ्हाड : साताऱ्यात मोकाट श्वानांच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला. त्यामुळे गावोगावी श्वानांविषयी प्रचंड भीती निर्माण झाली आहे. कऱ्हाडातही मोकाट श्वानांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत असून गल्ली-बोळांपेक्षा तेथे फिरणाऱ्या मोकाट श्वानांचीच संख्या जास्त असल्याचे निदर्शनास येते. शहरात तब्बल तीन हजारावर मोकाट श्वान वावरत असल्याचा दावा ‘अॅनिमल प्रोटेक्शन क्लब’ने केलाय. त्यामुळे रस्त्यावर नागरिकांना जीव मुठीत घेऊनच पावलं उचलावी लागताहेत.
कऱ्हाडात अनेक दिवसांपासून मोकाट श्वानांचा धुमाकूळ सुरू आहे. बसस्थानक परिसर, कृष्णा नाका, प्रीतिसंगम बाग परिसर, दत्त चौक, भेदा चौक यासह अन्य ठिकाणीही रात्रीच्या वेळी श्वानांची दहशत असते. रात्री दहानंतर काही ठिकाणी जाणेच नागरिकांना मुश्कील झाले आहे. वर्दळीच्या ठिकाणीही ते पाठलाग करून प्रवाशांसह नागरिकांनाही अक्षरश: सळो की पळो करून सोडतात. गतवर्षी बसस्थानक परिसरात एका मोकाट श्वानाने तब्बल ३५ जणांवर हल्ला केला होता. २००३ मध्ये रुक्मिणीनगरमध्ये एका बालिकेवर श्वानाने हल्ला केला होता. त्यावेळी श्वानांची नसबंदी करण्याबाबत ‘अॅनिमल प्रोटेक्शन’च्यावतीने पालिकेशी पत्रव्यवहार करण्यात आला. मात्र, पालिकेकडून त्या पत्रव्यवहाराला कसलाच प्रतिसाद मिळाला नाही़ पालिकेने मोकाट श्वानांचा प्रश्न त्यावेळी गांभीर्याने घेतला नाही. सुमारे पाच वर्षांपूर्वी नसबंदीची ही मोहीम राबविण्यात आली. ‘अॅनिमल प्रोटेक्शन’च्या सदस्यांनी शहरातील गल्ली-बोळांत फिरून श्वान पकडले व शस्त्रक्रिया केली. त्यावेळी सुमारे दीड हजार श्वानांवर शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर गतवर्षीही अशीच मोहीम राबविण्यात आली. त्यावेळी सुमारे १ हजार ७०० श्वानांची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
सध्या शहरातल्या कोणत्याही रस्त्यावर गेले तरी मोकाट श्वान आढळून येतात. रात्रीच्या वेळेस मोकाट श्वान कचरा कोंडाळ्याच्या आसपास तसेच चौका-चौकामध्ये आढळून येतात. त्याठिकाणी एखादा नागरिक गेल्यास त्याच्यावर हल्लाही होतो. त्यामुळे अनेकजण रात्रीच्यावेळी कचरा टाकण्यासाठी बाहेर फिरकतही नाहीत. रस्त्याच्या दुभाजकांमध्येही रात्री श्वानांचा वावर असतो.
- चौकट
मोकाट श्वान का पिसाळतात ?
१) वातावरणामध्ये होणाऱ्या बदलाचा सर्वात जास्त परिणाम श्वानांवर होत असतो़
२) श्वानांना वेळेत अन्न न मिळाल्यास, उपासमार झाल्यास त्यांच्या वागण्यात फरक पडतो़
३) घाण, दलदलीमध्ये श्वानांचा वावर जास्त असतो़. गढूळ पाणी पिल्यासही ते पिसाळतात़
४) श्वानाला मांसाची चटक लागलीच, तर ते पिसाळण्याची शक्यता जास्त असते़
५) उपाशी श्वानाला हुसकावले, दगड मारले तर तो हल्ला करण्याची शक्यता असते़
- कोट
एखाद्या नागरिकावर किंवा लहान मुलावर श्वानाने हल्ला केला की, श्वानांचा बंदोबस्त करण्याबाबत चर्चा होते. त्यानंतर ही चर्चा थांबते. कऱ्हाडात २०१९ मध्ये १ हजार ७०० श्वानांची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मांस विक्रेत्यांनी टाकाऊ अवशेष इतरत्र टाकू नयेत. त्यांची योग्य विल्हेवाट लावणे गरजेचे आहे.
- अमोल शिंदे, अॅनिमल ऑफिसर
मुंबई उच्च न्यायालय नियुक्त
- चौकट
श्वानांना ‘व्ही’ आकाराचे ‘टॅगिंग’
मोकाट श्वान पकडून त्यांची शस्त्रक्रिया करण्यात आल्यानंतर त्यांना सोडून देण्यात येते. मात्र, शस्त्रक्रिया झालेली श्वान ओळखून येण्यासाठी त्यांच्या कानाला ‘व्ही’ आकाराचे ‘टॅगिंग’ केले जाते. दोन वर्षापूर्वीही शस्त्रक्रिया करून अशा प्रकारचे ‘टॅगिंग’ करण्यात आले होते.
- चौकट
श्वान पकडताना खबरदारी...
मोकाट श्वानांचा शोध घेऊन ती पकडणे सहज सोपे नसते. ज्यावेळी अशी मोहीम राबविली जाते, त्यावेळी अॅनिमल वेल्फेअरच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना शहर परिसर पिंजून काढावा लागतो. मोकाट श्वान दिसताच त्यांना इजा न होता पकडावे लागते. हे काम करताना हल्ला होण्याची दाट शक्यता असते. तसेच श्वानाला दुखापत होऊ शकते, त्यामुळे खबरदारी घ्यावी लागते.
- चौकट
‘मल्टिव्हिटॅमीन’चा डोस
अनेकवेळा श्वानांना वेळेत अन्न मिळत नाही. त्यामुळे ती पिसाळण्याची शक्यता दाट असते. ही परिस्थिती ओळखून २०१९ मध्ये शस्त्रक्रिया केल्यानंतर ‘अॅनिमल प्रोटेक्शन’ने पकडलेल्या श्वानांना ‘अँटिरेबीज’ची लस व ‘मल्टिव्हिटॅमीन’चा डोस दिला होता.
फोटो : २४केआरडी०७
कॅप्शन : प्रतिकात्मक