सातारा : बेकायदा वाळूची चोरटी वाहतूक करत असताना सातारा तालुका पोलिसांनी तीन ट्रक पकडले असून, त्यांच्याकडून बारा ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसांशी हुज्जत घातल्याप्रकरणी तिघांवर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना अटक करण्यात आली आहे.जमीर जहागिर शेख (वय ३५, रा. शनिवार पेठ, सातारा), विक्रम मोहन सुतार (वय ३१, रा. जाकणगाव, ता. खटाव), महादेव चंद्रकांत पवार (रा. ज्योतिबा रोड इंदिरानगर कोल्हापूर, सध्या रा. शिवराज तिकाटणे, सातारा) अशी अटक झालेल्यांची नावे आहेत.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सजन हंकारे हे गुरुवार रात्री पावणेनऊच्या सुमारास महामार्गावर गस्त घालत होते. त्यावेळी नागेवाडी, ता. सातारा गावच्या हद्दीत लिंबफाट्यानजिक सर्व्हिस रस्त्यावर तीन ट्रक उभे होते. पोलिसांनी जवळ जाऊन पाहिले असता ट्रकमध्ये वाळू भरली होती.
संबंधित तीन चालकांकडे पोलिसांनी वाळूच्या पावत्या आहेत का, याची विचारणा केली. मात्र, त्यांच्याकडे पावत्या नसल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ट्रक पोलीस ठाण्यात घेऊन चला, असे सांगितले. परंतु त्यांनी आडेवेडे घेऊन उलट पोलिसांशीच हुज्जत घातली.
अखेर कसेबसे पोलिसांनी त्यांची समजूत काढून सर्व ट्रक सातारा तालुका पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर संबंधितांवर शासकीय कामात अडथळा आणि बेकायदा वाळू चोरीचा गुन्हाही पोलिसांनी दाखल केला. १२ ब्रास वाळू आणि तीन ट्रक असा सुमारे १५ लाख ८४ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.