सातारा : जिल्ह्यातील आठ नगरपालिका व सहा नगरपंचायतींसाठी लागलेल्या निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी मोठ्या संख्येने अर्ज मागे घेण्यात आले. त्यानंतर निवडणूक चित्र स्पष्ट झाले. आठ नगराध्यक्षपदासाठी ४९ तर २७९ नगरसेवकपदांसाठी तब्बल १०५० उमेदवार रिंगणात आहेत. कऱ्हाड, फलटण पालिका व वडूज नगरपंचायतीत प्रत्येकी एकजण बिनविरोध निवडून आला. अर्ज मागे घेण्याच्या दिवशी कऱ्हाड पालिकेच्या प्रभाग सहामधून जनशक्ती आघाडीच्या माजी नगराध्यक्षा शारदा जाधव बिनविरोध विजयी झाल्या. फलटणच्या प्रभाग एकमधून राष्ट्रवादीचे विक्रम जाधव व वडूज नगरपंचायतीत प्रभाग नऊमध्ये छाया शशिकांत पाटोळे या बिनविरोध विजयी झाल्या. सातारा पालिकेत नगरसेवकपदाच्या ४० जागांसाठी सर्वाधिक १९०, त्या पाठोपाठ फलटणमध्ये ९०, पाचगणी ७८ तर महाबळेश्वरमध्ये ६० उमेदवार रिंगणात आहेत. बहुतांश ठिकाणी पंचरंगी लढती होत असल्याने शनिवारपासून प्रचाराच्या तोफा खऱ्या अर्थाने धडाडणार आहेत. ८ नगराध्यक्षपदांसाठी ४९ रिंगणात आठ नगरपालिकांमध्ये नगराध्यक्ष थेट मतदारांमधून निवडला जाणार आहे. त्यामुळे नशीब अजमावण्यासाठी अनेक इच्छुक पुढे आले आहे. यामध्ये सातारा पालिकेत ७, कऱ्हाड १२, फलटण ५, वाई ५, महाबळेश्वर ५, पाचगणी ९, म्हसवड ६, रहिततपूर ३ असे एकूण ४९ जण रिंगणात आहेत.
पालिकात तिघांची बिनविरोध सलामी!
By admin | Published: November 11, 2016 11:14 PM