बामणोली : राज्यात आणि विशेषतः सातारा जिल्ह्यात कोरोनाने आपले हातपाय खेडोपाडी पसरायला सुरुवात केली असली तरी जावली तालुक्यातील दुर्गम विभागातील कोळघर, कारगाव व गोंदेमाळ या गावात गेल्या वर्षीपासून कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. ही तिन्ही गावे अभिनंदनास पात्र असून, गावाची एकी, मास्कचा वापर, वेळोवेळी औषध फवारणी, शासकीय नियमांची काटेकोर अंमलबजावणी करून सक्षम ग्रामसमिती आणि ग्रामसेवक यांनी एकत्रित कामाचा आदर्श जिल्ह्यासमोर ठेवला आहे.
सातारा जिल्ह्यातील दररोजची कोरोना रुग्णांची आकडेवारी ऐकल्यावर धडकी भरतेय. मात्र, काही सकारात्मक कानावर पडल्यावर मनाला शांती लाभत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक खेडेगावात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. मात्र, जावली तालुक्यातील कोळघर, कारगाव व गोंदेमाळ गावातील ग्रामस्थांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे कोरोनाला आपले खाते उघडता आले नाही. कमी लोकसंख्येची ही गावे आहेत. मात्र, गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्तरीय समिती आणि ग्रामसेवक यांनी शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करून आपला गाव आणि गावातील प्रत्येक माणूस कोरोनापासून चार हात लांब ठेवला आहे.
या तिन्ही गावांतील ग्रामस्थ आणि मुंबईकर मंडळींचे मोठे सहकार्य यासाठी लाभले आहे. गतवर्षीपासून जसा कोरोना सुरू झाला, तसे या गावांनी कडक नियम लावून त्याचे पालन करून दाखवले आहे. गावात येणाऱ्याला चौदा दिवस विलगीकरणात ठेवले जात होते. कोरोना चाचणी करून मगच गावात घेतले जात होते. विलगीकरणातील कुटुंबाला रेशन, तरकारी घरपोच पुरवली जात होती. वेळोवेळी गावात औषध फवारणी करण्यात आली. प्रत्येक घरात आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप केले, मास्कचा काटेकोरपणे वापर केला गेला, लग्न सोहळे फक्त दहा ते वीस माणसातच उरकण्यात आले. सामाजिक अंतर प्रत्येकाने पाळले. त्यामुळे या तिन्ही गावात कोरोनाने अद्याप शिरकाव केलेला नाही.
कोट :
गावचे सरपंच सुमन शिंदे, सदस्य व ग्रामस्तरीय समिती यांनी खूप चांगले काम केले. ग्रामस्थांनीही आम्हाला सहकार्य केले. गावातील पंचेचाळीस वर्षांच्या सर्व नागरिकांचे शंभर टक्के आम्ही लसीकरण करून घेतले आहे. सांघिक प्रयत्नांमुळे आम्ही कोरोनाला गावाबाहेर ठेवण्यात यशस्वी झालो.
- राजेंद्र राऊत, ग्रामसेवक, कोळघर, ता. जावली
कोट :
गावात कोरोना येऊच द्यायचा नाही, असा आम्ही चंग बांधला होता. नियमित औषध फवारणी केली. मास्कचा वापर केला. मुंबईकर गावात आला तर विलगीकरण करून नंतर टेस्ट करूनच गावात घेतले जात होते. गावाने एकीचे बळ दाखवले म्हणून आमचे गाव कोरोनापासून सुरक्षित राहिले.
- सुमन शिंदे, सरपंच, कोळघर, ता. जावली
कोट : मुळात आमचे गाव एकदम दुर्गम विभागात आहे. गावातील माणसांचा बाहेरच्या जगाशी खूप कमी संपर्क येतो. मुंबईकर गेल्या वर्षी आले होते. त्यांना विलगीकरणात ठेवले होते. यावर्षी आलेच नाहीत. गावात कोणाचे येणे-जाणे नाही. तरीही नागरिक सुरक्षेची पुरेपूर काळजी घेत आहेत.
- संदीप लोखंडे, ग्रामसेवक, कारगाव, ता. जावली
लोगो : पॉझिटिव्ह स्टोरी