मलकापूर : मुंबईहून इचलकरंजीकडे येणाऱ्या चालत्या खासगी प्रवासी बसला अचानक आग लागल्याने महामार्गावर द बर्निंग बसचा थरार झाला. पुणे - बंगळुरू महामार्गावर विरवडे गावच्या हद्दीत ही घटना घडली. या आगीत बसच्या टायरसह पाठीमागील भाग जळून खाक झाल्यामुळे लाखोंचे नुकसान झाले आहे. चालकाच्या प्रसंगावधानामुळे ३५ प्रवाशांचा जीव वाचवल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, अग्निशामक बंबाच्या साह्याने दोन तासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. तोपर्यंत महामार्गाच्या सातारा - कोल्हापूर लेनवरील वाहतूक ठप्प झाली होती.घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संजय ट्रॅव्हल्स कंपनीची बस (एमएच ०९ एफएल ०७८९) ३५ प्रवासी घेऊन मुंबईहून इचलकरंजीकडे येत होती. पुणे - बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास ट्रॅव्हल्स वराडे गावच्या हद्दीत आली असता पाठीमागील टायरला आग लागल्याचे चालकाच्या निदर्शनास आले. चालकाने प्रसंगावधान राखत बस महामार्गाच्या कडेला थांबवली. टायर पेटल्याने बसला आग लागली आणि बघता - बघता संपूर्ण बस पेटली. बसमधून ३५ प्रवासी मुंबई ते इचलकरंजी असा प्रवास करत होते. त्या सर्व प्रवाशांना पेटलेल्या बसमधून सुरक्षितरीत्या खाली उतरवण्यात यश आले. घटनेची माहिती मिळताच तळबीड पोलिस स्टेशनचे कर्मचारी तसेच महामार्ग देखभाल कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, कऱ्हाड नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाचा बंब बोलावण्यात आला. या अग्निशामक दलाच्या साह्याने बसला लागलेली आग दोन तासांच्या प्रयत्नाने विझविण्यात आली. बसने पाठीमागील बाजूने पेट घेतला. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक सेवा रस्त्याने वळवण्यात आली होती. अग्निशामक दलाकडून आग विझविण्यात आल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.ब्रेक लायनर गरम झाल्याने आग?मुंबई ते इचलकरंजी ३५ प्रवासी घेऊन येत असताना वराडे गावाजवळ बसच्या मागील चाकाचे ब्रेक लायनर गरम होऊन धूर येऊ लागल्याने चालकाने बस रस्त्याच्या कडेला थांबवली. तळबीड पोलिसांनी घटनास्थळी जाऊन बसमधील प्रवासी व साहित्य बसमधून सुरक्षित उतरवले. ब्रेक लायनर गरम झाल्याने आग लागली, अशी घटनास्थळी चर्चा होती.
पुणे-बंगळुरू महामार्गावर द बर्निंग बसचा थरार, ३५ प्रवासी बचावले; दीड तास लेन बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2022 2:21 PM