सातारा : वाई तालुक्यातील उडतारे येथील सरसाबाई बाबर या आजीने नातीला असलेली जट सोडवण्यासाठी तिला अंधश्रद्धा निर्मूलन समितीपर्यंत आणले. त्याचबरोबर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने प्रबोधन करून जटा निर्मूलन केले.याबाबत माहिती अशी की, वैशाली शहाजी भोसले (रा. शिरगाव, ता. वाई) यांना आजारपणात न विंचरल्यामुळे केसामध्ये गुंता झाला होता. त्यानंतर त्याची जट तयार झाली व वाढत गेली. पुढे त्याचा त्रास होऊन ओझे वाटू लागले. काही कामानिमित्त त्या माहेरी आल्या होत्या.
तेव्हा जटाबाबत चर्चा झाली. कोणी देवाचे करा, असे सांगितले; पण सरसाबाई बाबर या आजीने परिवर्तन संस्थेच्या कामाबद्दल ऐकले असल्याने त्यांनी वैशाली व त्यांच्या आईस परिवर्तन संस्था येथे आणले. तेथील सामाजिक कार्यकर्ते उदय चव्हाण यांच्याशी चर्चा करून त्यांच्या मनातील भीती दूर केली. तसेच जटा निर्मूलन केले.व्यवस्थित निगा न राखल्याने केसांमध्ये गुंता तयार होतो. हा गुंता कंगव्याने सोडवण्याऐवजी दैवी कारण लावून त्यावर विशिष्ट प्रकारचे द्रव्य आणि इतर काही गुंता वाढवणारे पदार्थ लावले जातात. त्यामुळे जटा आणखी घट्ट होते.