टपाल कार्यालयाची विशेष मोहीम
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : आपल्या ओळखीचा महत्त्वाचा पुरावा असलेल्या आधार कार्डला आपला मोबाईल क्रमांक आता घरबसल्या लिंक करता येणार आहे. यासाठी टपाल कार्यालयाकडून जिल्ह्यात दि. २७ ते ३० सप्टेंबर या कालावधीत आधार आणि मोबाईल लिंकिंग मोहीम राबविली जाणार आहे. विशेष म्हणजे टपाल कार्यालयासह पोस्टमनकडून ही सेवा घरपोच उपलब्ध केली जाणार आहे.
आधार कार्ड हे आपल्या आयुष्यातील महत्त्वाचं ओळखपत्र आहे. अगदी सीमकार्डपासून ते घर घेण्यापर्यंत आधार कार्डची गरज भासते. कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आधार कार्ड लागतंच. आधार कार्डची ओळख झाल्यापासून त्यात अनेक बदल झाले. त्याचप्रमाणे आधारला मोबाईल क्रमांक लिंक करणे बंधनकारक करण्यात आले. आधारला मोबाईल क्रमांक लिंक नसल्यास पॅन कार्ड, पासपोर्ट, वाहन परवाना काढताना अनेक अडचणी येतात. त्यामुळे टपाल कार्यालयाने जिल्ह्यात दि. २७ ते ३० सप्टेंबर या कालावधीत आधार आणि मोबाईल लिंकिंग मोहीम राबविण्याचे नियोजन केले आहे.
आधार लिंकिंग जवळच्या टपाल कार्यालयात केले जाणार आहे. शिवाय पोस्टमनच्या माध्यमातूनही ही सेवा घरपोच उपलब्ध केली जाणार आहे. ज्या नागरिकांनी आपला मोबाईल आधारला लिंक केलेला नाही असे नागरिक, सोसायटीमधील रहिवासी यांनी एकत्रितपणे या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सातारा टपाल विभागाच्या प्रवर अधीक्षक अपराजिता मिश्रा यांनी केले आहे.