सातारा : कोयना, नवजा, महाबळेश्वर येथे पावसाने उघडीप दिली असलीतरी साताºयात मात्र रविवारी सायंकाळी ढगाच्या गडगडाटात जोरदार सरी कोसळल्या. तर पूर्व भागात दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.यावर्षी जून महिन्यापासून जिल्ह्यात पावसाला प्रारंभ झाला. सप्टेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत जिल्ह्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस सुरू होता. त्यामुळे कोयनेसह धोम, कण्हेर, उरमोडी, बलकवडी, तारळी आदी धरणे वेळेच्या पूर्वी भरली. पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी वारंवार धरणातून पाणी सोडण्यात आले. परिणामी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली. सध्या मात्र पश्चिम भागात पावसाने उघडीप दिली आहे. कोयनानगर येथे शुक्रवारी चांगला पाऊस झाला होता. हा अपवाद वगळता गेल्या १२ दिवसांपासून कोयनेत पावसाची उघडीप कायम आहे. रविवारी सायंकाळपर्यंत कोयना धरणात ९७.३९ टीएमसी पाणीसाठा होता. कोयनानगर येथे आतापर्यंत ५३९५ मिलीमीटर पाऊस झाला असून, धरणातील विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. महाबळेश्वर, नवजा येथेही पाऊस झालेला नाही.सातारा शहरात रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ढगांच्या गडगडाटात पावसाच्या सरी कोसळल्या. यामुळे नागरिकांची धावपळ उडाली. आठवडी बाजारासाठी आलेल्या परगावच्या लोकांनाही सुरक्षितस्थळी थांबावे लागले. तर जिल्ह्याच्या पूर्व भागातील माण, खटाव, फलटण या तालुक्यांत पावसाची पडती भावना झाली आहे. काही गावांत पावसाने हजेरी लावली आहे. मात्र, आजही अनेक गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे दुष्काळी तालुक्यात सर्वत्रच दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.