सातारा : जिल्ह्यात रविवारी सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटात वाऱ्यासह पाऊस पडला. यामुळे वीजपुरवठाही खंडित झाला. तसेच पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.जिल्ह्यात आॅगस्ट महिना सुरू झाल्यापासून पावसाची उघडीप होती. पश्चिम भागातील कोयना, नवजा, महाबळेश्वर, तापोळा, बामणोली भागात अत्यल्प पाऊस व्हायचा. तर दुष्काळी भागात पावसाची उघडीप होती. मात्र, रविवारी सकाळपासून जिल्ह्यात प्रचंड उकाडा जाणवत होता. त्यामुळे पाऊस होणार अशी चिन्हे दिसत होती. सायंकाळनंतर जिल्ह्यात विविध ठिकाणी जोरदार वारे, ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटात पावसास सुरूवात झाली.साताऱ्यात रविवारी रात्रीच्या सुमारास विजांच्या झगमगटातात आणि ढगांच्या गडगडाटात जोरदार पाऊस झाला. यामुळे शहरातील विजपुरवठाही काहीकाळ खंडित झाला होता. रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरू होता.कऱ्हाड तालुक्यातही मुसळधार पावसामुळे सोयाबीन, भुईमूग पिकांचे मोठे नुकसान झाले. तर ऊस भुईसपाट झाला. माण तालुक्यातील म्हसवडसह दहिवडी परिसरातही मुसळधार पाऊस झाला. यामुळे विजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार घडला.खंडाळा तालुक्यातील शिरवळलाही रविवारी रात्रीच्या सुमारास पावसाने झोडपून काढले. यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. महाबळेश्वर तालुक्यातही विजांच्या कडकडाटात मुसळधार पावसाने हजेरी लावली. कऱ्हाड तालुक्यातील मसूर परिसरात सुमारे दीड तास ढगांच्या गडगडाटात पाऊस झाला. या पावसामुळे परिसरातील वीजपुरवठा बंद झाला होता.खटावमध्येही एक तास मुसळधार पाऊस कोसळला. विजांच्या कडकडाटात हा पाऊस झाला. यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. वडूज परिसरातही मुसळधार पाऊस झाला. कोरेगावसह तालुक्यात अनेक ठिकाणी वादळासह विजांच्या कडकडाटात पाऊस झाला. यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते.
कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातही पुन्हा जोरदार पाऊस झाला. तर सातारा शहराच्या पश्चिम भागातील कास परिसरात विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस झाला. तसेच सातारा शहराजवळील शेंद्रे परिसरातही वादळासह जोरदार पाऊस झाला. यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता.कोयना धरणात १०३ टीएमसी पाणीसाठा...पश्चिम भागात अत्यल्प पाऊस होत आहे. त्यामुळे कोयना धरणातही पाण्याची आवक कमीच होत आहे. सोमवारी सकाळच्या सुमारास धरणात १०२.९८ टीएमसी ऐवढा पाणीसाठा झाला होता. तर सकाळपर्यंत कोयनेला १२, नवजा येथे १५ आणि महाबळेश्वर येथे ११ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती.