मायणी : उन्हाळ्याच्या तोंडावर मायणी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेचे बिल थकल्यामुळे वीज पुरवठा खंडित करण्यात आला. यामुळे मायणी ग्रामस्थांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. चार ते पाच हजार लिटर पाण्याच्या टँकरसाठी पाचशे ते सहाशे रुपये मोजावे लागत आहेत.
याबाबत माहिती अशी की, मायणी गावास पिण्याचे पाणी देण्यासाठी येरळवाडी येथील मध्यम प्रकल्पातून प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली होती. या प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेचे वीज बिल सुमारे तीन कोटी १२ लाख रुपये थकीत गेल्याने संबंधित वीज वितरण कंपनीकडून या प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित केल्याने ग्रामस्थांवर पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. सध्या मायणी परिसरातील चितळी रोड, शिक्षक कॉलनी, मोराळे रोड, यशवंत नगर, खंडोबा नगर, नदाफ काॅलनी, वडूज रोड, कचरेवाडी भागातील ग्रामस्थ पिण्यासाठी व रोजच्या वापरासाठी लागणारे पाणी टँकरद्वारे विकत घेत आहेत. सध्या चार ते पाच हजार लिटर पाणी क्षमता असलेल्या टँकरसाठी पाचशे ते सहाशे रुपये ग्रामस्थांना मोजावे लागत आहेत.
चौकट
येथील महादेव मंदिर परिसरामध्ये असलेल्या सार्वजनिक विहिरीतून गावातील नाथ मंदिर परिसर, यशवंतबाबा मंदिर परिसर, चावडी चौक परिसर, उभी पेठ, नवी पेठ, मठाची गल्ली, चव्हाण गल्ली व मराठी शाळेच्या पाठीमागील भागांमध्ये नळ पाणीपुरवठा सुरळीत सुरू आहे. त्यामुळे या भागात फारशी पाणीटंचाई जाणवणार नाही.
चौकट
पिण्यासाठी साठविलेले पाणी
अनेक वर्षांपासून मायणी गावास नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने अनेक कुटुंबांमध्ये पाच ते सहा हजार लिटर पाणी साठवून ठेवण्याची क्षमता असलेली भांडी व पाण्याच्या टाक्या असल्याने किमान आठ ते दहा दिवस पाणी आले नाही तरीही पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक असतो. यातीलच पाण्याचा मायणी ग्रामस्थ पिण्यासाठी व रोजच्या वापरासाठी वापरत करीत आहेत.
१५मायणी-वॉटर
मायणी पाणीपुरवठा योजनेचे बिल थकीत असल्याने वीज तोडण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामस्थ टँकरने पाणी विकत घेत आहेत. (छाया : संदीप कुंभार)