शेखर जाधव
लोकमत न्यूज नेटवर्क
वडूज : खटाव, माण तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या कलेढोण, पुसेगाव व एनकुळ ग्रामपंचायत निवडणुकीत अनपेक्षित निकाल लागले. या अटीतटी व प्रतिष्ठेच्या राजकीय लढाईतून दिग्गजांना आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. तर रणजितसिंह देशमुख यांनी निमसोडचा गड पुन्हा राखला आहे.
खटाव तालुक्यातील कलेढोण ग्रामपंचायतीत सत्ताधारी राष्ट्रीय काँग्रेसच्या संजीव साळुंखे गटाला जोरदार धक्का बसला आहे. येथे राष्ट्रवादीच्या अॅड. शरदचंद्र भोसले यांनी सत्ता काबीज केली. एनकुळ ग्रामपंचायतीतील सत्ताधारी व राष्ट्रवादीचे प्रा. अर्जुन खाडे यांच्याकडे जिल्हा बँकेचे संचालकपद आहे. त्याचबरोबर त्यांची स्नुषा कल्पना खाडे या जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती असतानाही या ठिकाणी भाजपने जोरदार मुसंडी मारली. ९ पैकी भाजपला ६ तर राष्ट्रवादीला ३ जागा मिळाल्या आहेत. हा अनपेक्षित निकाल राष्ट्रवादीसाठी विचार करणारा ठरला आहे.
निमसोड येथे देशमुख व मोरे हे पारंपरिक राजकीय विरोधक. या ठिकाणी मोरे बंधुंच्या फुटीचा राजकीय फायदा घेत १५ पैकी ९ जागा जिंकत रणजितसिंह देशमुख यांनी आपले व काँग्रेस पक्षाचे निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. हरणाई सूतगिरणीचे अध्यक्ष असणाऱ्या देशमुख यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी पॅनेलने पूर्ण केलेली महत्त्वाकांक्षी हिंगणगाव नळपाणी पुरवठा योजना व विविध विकासकामांच्या जोरावर विरोधी नंदकुमार मोरे व काकासो मोरे यांच्या दोन्ही पॅनेलला चितपट केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नंदकुमार मोरे यांचे बंधू जनार्दन मोरे व मुलगा पवन मोरे यांना पराभवाची नामुष्की पत्करावी लागली. केवळ एकाच जागेवर निसटता विजय मिळवत समाधान मानावे लागले. परिवर्तनाची मोठी लाट निर्माण करीत काकासो मोरे गटाने पाच जागा जिंकल्या. मात्र, पॅनेलप्रमुख काकासो मोरे यांना मोठी हार पत्करावी लागली. अटीतटीच्या निवडणुकीत रणजितसिंह देशमुख यांना मतदारांनी सत्तेची चावी पुन्हा एकदा दिली आहे. पुसेगाव ग्रामपंचायत निकालाद्वारे रणधीर जाधव यांना मतदारांनी विचार करण्यास भाग पाडले आहे.
चौकट :
धक्कादायक निकालातून राजकीय गोची...
कलेढोण, एनकुळ, पुसेगाव, निमसोडसह खटाव तालुक्यातील प्रमुख गावांत धक्कातंत्र निकालातून नेतेमंडळींची राजकीय गोची झाल्याचे दिसून आले. तसेच पराभूत नेतेमंडळींनी आत्मपरीक्षण करावे, असा निकालच तालुक्यातील मतदारांनी दिला आहे.
फोटो दि.१८वडूज देशमुख फोटो ०१ नावाने...
फोटो: निमसोड ग्रामपंचायतीवर सत्ता मिळविल्यानंतर रणजितसिंह देशमुख यांना उचलून घेत कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. ( छाया : शेखर जाधव)
-----------------------------