फलटण : टेलरिंग हा लघुउद्योग असून, कोरोना लॉकडाऊनमध्ये शासनाने लघु उद्योगांना व्यवसाय सुरू ठेवण्यास परवानगी दिलेली असताना, स्थानिक प्रशासनाने लावलेल्या निर्बंधांमुळे जिल्ह्यात हा लघु व्यवसाय बंद राहिल्याने अतोनात नुकसान झाले आहे. तरीही स्थानिक प्रशासनाचे निर्बंध स्वीकारून गेले सव्वावर्ष आम्ही नुकसान सोसले. आता ते शक्य नसल्याने परवानगी द्यावी, अशी मागणी फलटण शहर व तालुक्यातील टेलरिंग व्यावसायिकांनी निवेदनाद्वारे केली आहे.
फलटण शहर व तालुक्यातील टेलरिंग व्यावसायिकांनी प्रांताधिकारी, तहसीलदार, नगरपरिषद मुख्याधिकारी, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिले असून, लघु व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती केली आहे.
विवाह समारंभात नवे कपडे ही प्राधान्यक्रम असलेली बाब असून, लॉकडाऊन शिथिल होत असताना प्रशासनाने मर्यादित लोकांच्या उपस्थितीत विवाह समारंभास परवानगी देण्याचे धोरण स्वीकारले असताना, टेलरिंग व्यवसायावरील निर्बंध कायम असल्याने वधू-वर आणि कुटुंबीयांना नवे कपडे शिवून मिळत नाहीत. दुकाने बंद असल्याने रेडिमेड ड्रेस मिळत नसल्याने त्यांची कुचंबणा होत आहे. त्याचबरोबर आमचे उत्पन्न नाहक बुडत आहे, याचा विचार व्हावा, अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
आमचे व्यवसाय बंद असले तरी जागा भाडे, लाईट बिल, कामगार पगार, नगरपरिषद कर आदी बाबी चुकणार नाहीत, त्याचबरोबर आमच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी अन्य व्यवस्था नसल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आल्याने, तसेच काहींवर येण्याची शक्यता असल्याने आम्हा टेलरिंग व्यावसायिकांना आमचे लघुउद्योग सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
चौकट..
शासनाचे सर्व नियम पाळू..
प्रशासनाने परवानगी दिल्यास मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग यासह सर्व नियम निकष सांभाळून आपण द्याल त्या वेळेत आमचे लघुउद्योग सुरू ठेवण्यास आम्ही बांधील राहू, याची ग्वाही निवेदनाद्वारे देण्यात आली आहे.