नागठाणे : साताऱ्याहून कोल्हापूरला निघालेल्या शिवशाही बसचा पुढील टायर फुटून झालेल्या अपघातात एक महिला प्रवासी जखमी झाली. हा अपघात मंगळवारी दुपारी नागठाणे, ता. सातारा येथे झाला. दरम्यान, बस दुभाजकाला धडकल्याने मोठा अनर्थ टळला.गौरी मधुकर सद्रे (वय ४०, रा. पुणे) असे जखमी महिलेचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, शिवशाही बस ३१ प्रवासी घेऊन साताऱ्याहून कोल्हापूरला निघाली होती. पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर नागठाणे, ता. सातारा येथील पेट्रोल पंपासमोर शिवशाही बस पोहोचल्यानंतर बसचा पुढील टायर अचानक फुटला. त्यामुळे चालक दिलीप केसरकर (वय ३८, रा.राधानगरी, जि. कोल्हापूर) यांचा बसवरील ताबा सुटला.
बस दुभाजकचा कठडा तोडून काही अंतरावर अडकली. त्यामुळे संभाव्य होणारा मोठा धोका टळला. बसमधील काही प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्या मात्र, गौरी सद्रे या अपघातात गंभीर जखमी झाल्या. त्यांना रुग्णवाहिकेने जवळच्याच खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. मात्र, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक पूर्ववत केली.