लोकमत न्यूज नेटवर्क
किडगाव : सध्याचे युग हे धावपळीचे युग म्हणून ओळखले जाते. धावपळीच्या जगात स्वतःचे मन रमवण्यासाठी नवीन पिढी नवनवीन पर्यटनस्थळांवर जाऊन स्वतःचे मन रमवण्यासाठी प्रयत्न करतात. गेली दीड वर्षापासून कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे अनेक लोक आपल्या घरातच आहेत. घरी बसून कंटाळलेल्या जिवाला थोडाफार आनंद मिळावा म्हणून गावाशेजारी असणाऱ्या डोंगरकपारीत लोक आता जाऊ लागले आहेत.
सातारा शहराच्या पश्चिमेस असलेल्या ब्रह्मेंद्रस्वामीची समाधी असलेल्या धावडशी गावाजवळ सुळपणी नावाच्या डोंगराकडे पर्यटकांची संख्या गेली दोन वर्षांपासून वाढू लागल्याने ते एक नवीन पर्यटनस्थळ म्हणून उदयास येऊ लागले आहे. सुळपणी डोंगराची समुद्रसपाटीपासून उंची सुमारे १०९२ मीटर आहे. त्यामुळे सुसाट सुटणारा गार वारा अंगाला चांगलाच आनंद देतो. या डोंगरावर प्राचीन काळी एक मंदिर होते. कुशी, महामुलकरवाडी, किडगाव, पिंपळवाडी, धावडशी येथील युवकांनी या मंदिराचा कायापालट केला आहे. या मंदिरात सिद्धनाथ देवाची सुंदर मूर्ती बसवली आहे. चारी बाजूला पेव्हर ब्लॉक बसवून सुशोभीकरण करण्यात आले आहे तर येथे वीज, सीसीटीव्ही कॅमेरा यांचीही व्यवस्था कुशी येथील युवकांनी केल्याने हा मंदिर परिसर रात्रीही उजळून दिसतो. येथे लावण्यात आलेला भलामोठा भगवा ध्वज युवकांना नवीन ऊर्जा देत सदैव फडकत असतो. पर्यटकांना बसण्यासाठी जागोजागी बाकड्यांची सोयही करण्यात आली आहे.
सुळपणीच्या डोंगरावर कसे जाल....
या पर्यटनस्थळी जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. नेले किडगाव मार्गे धावडशी गावात पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी प्रथम ब्रम्हेंद्रस्वामींचे दर्शन घेऊन मंदिर परिसरात चक्कर मारुन गणपत खिंड मार्गे सुळपणीचाकडा पार करून डोंगरावर जाऊ शकतात. गणपत खिंडीत धावडशी येथील युवकांनी गणपतीचे मंदिर बांधले असून गणपतीचे दर्शन घेऊन नयनरम्य अशा डोंगरावर विहार करू शकतो. कुशी मार्गे पश्चिमेस पायी चालत किंवा दुचाकीवरुन सुमारे तासभर चडणं करून पहिली गवळण, दुसरी गवळण, पाझर तलाव अशी लक्षवेधी पर्यटन स्थळे दृष्टिक्षेपात येतात.
भौगोलिक रचना वैशिष्ट्यपूर्ण
तिन्ही बाजूला डोंगररांगा आणि मधेच उंच असा सुळका असल्याने या डोंगराला सुळपणी हे नाव पडले आहे. या डोंगरावरून पश्चिम दिशेस मेरुलिंगचे सुंदर मंदिर तसेच कण्हेर धरण, कास पठार, किल्ले अजिंक्यतारा, विस्तीर्ण असे विस्तारलेले सातारा शहर, पूर्वेस चंदन वंदन गड तसेच कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्वर याचेही दर्शन या ठिकाणावरून होते.
प्रत्येक युवकांनी काही ना काही मदत केली असल्याने या सुळपणीच्या डोंगराचा कायापालट झाला आहे. धावडशी मार्गे जाण्यासाठी एक ते दीड तास पायी चालावे लागते. महामुलकरवाडी मार्गेही तासाभरात तसेच कुशी मार्गही तासाभराचा प्रवास करून या नयनरम्य पर्यटनस्थळावर जाता येते.
फोटो २५किडगाव
सातारा तालुक्यातील धावडशी परिसरातील सुळपणी येथे निसर्गाचा आनंद घेण्यासाठी जात आहेत.