सातारा : पावसाळा सुरू झाल्यापासून आपल्या कानावर कधी टीएमसी तर क्युसेक, कधी इंच तर कधी मिलीमीटर असे शब्द आदळू लागले आहेत. मात्र, आजही अनेकांना क्युसेक, टीएमसी म्हणजे काय? सर्वत्र पाऊस मिलिमीटरमध्ये मोजला जात असताना महाबळेश्वरात पाऊस इंचात का बरं मोजतात? या प्रश्नाचे कोडे अनेकांना उलगडलेले नाही. ‘टीएमसी’ हे धरणातीलपाणीसाठा मोजण्याचे तर ‘क्युसेक’ पाण्याचा प्रवाह मोजण्याचे परिमाण आहे.
एक टीएमसी म्हणजे किती?‘थाऊजंड मिलियन क्युबिक फीट’चे संक्षिप्त रूप ‘टीएमसी’. हे धरणातीलपाणीसाठा मोजण्याचे परिमाण आहे. एक टीएमसी पाणी म्हणजे एक अब्ज घनफूट. हेच परिमाण लिटरमध्ये गृहीत धरले तर २८ अब्ज ३१ कोटी ६८ लाख ४६ हजार ५९२ लिटर इतके होते. कोयना धरणाची साठवण क्षमता १०५.२५ टीएमसी इतकी आहे. यामुळे धरणात किती लिटर पाणी असू शकते, याची कल्पनाच न केलेली बरी.
एक क्युसेक म्हणजे २८.३१७ लिटर‘क्युसेक’ पाणी प्रवाह मोजणारे परिमाण आहे. प्रतिसेकंद एक क्युसेक म्हणजे २८.३१७ लिटर पाणी. पाण्याचा प्रवाह मोजण्याचे दुसरे एक परिमाण म्हणजे ‘क्युमेक’. प्रतिसेकंद एक क्युमेक म्हणजे एक हजार लिटर.
महाबळेश्वरचा पाऊस ‘इंचा’त का मोजतात?ब्रिटिशांनी इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटची स्थापना केली. त्यांनी थंड व अतिपर्जन्यवृष्टीचा प्रदेश असलेल्या महाबळेश्वरात आपली वसाहत वसविल्यानंतर येथील पर्जन्यमानाचे मोजमाप सुरू केले. ब्रिटिशांकडून येथील पाऊस इंचात मोजला जायचा. विशेष म्हणजे आजही महाबळेश्वर पालिकेकडून पाऊस मोजण्यासाठी इंच व मिलिमीटर हे एकक वापरले जाते. एक इंच म्हणजे २४ मिलिमीटर पाऊस.