सातारा : जिल्ह्यात यावर्षी पावसाने वेळेत हजेरी लावली असली तरी सातत्य नाही. त्यामुळे कमी अधिक प्रमाणात पाऊस होत आहे. तर यंदाची समाधानकारक बाब म्हणजे धरणात बऱ्यापैकी पाणीसाठा आहे. कोयनेत गतवर्षीपेक्षा एक टीएमसी जादा साठा असून धोम, बलकवडी धरणात वाढ झाली आहे. तर उरमोडी, तारळी धरणात कमी साठा आहे. सध्या अपवाद वगळता पावसाने उघडीप दिली आहे.यावर्षी उन्हाळ्यात वळवाचे एक-दोन पाऊस झाले. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वांच्या आशा मान्सूनच्या पावसावर होत्या. गेल्यावर्षी काही दिवस उशिरा आलेला मान्सून यंदा मात्र ठरल्या वेळेत दाखल झाला.
जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस अनेक ठिकाणी झाला. यामुळे सर्वांनाच हायसे वाटले. पण त्यानंतर पावसाने दडी मारली. काही दिवसांनंतर पुन्हा पाऊस सुरू झाला आणि पश्चिम भागात दमदार हजेरी लावली. सध्या मात्र या पावसाने उघडीप दिली आहे.जिल्ह्यातील धरणात यंदा बऱ्यांपैकी साठा टिकून आहे. कोयनेत गतवर्षी २९.८८ टीएमसी पाणीसाठा होता. आता तो ३०.८० असून गतवर्षीपेक्षा एक टीमएसीने जादा आहे. बलकवडी धरणातही अधिक साठा आहे. गेल्यावर्षी ०.६४ तर यंदा ०.८८ टीएमसी आहे. तारळी धरणात गेल्यावर्षी १.३७ तर आता एक टीमएसी साठा असून, कण्हेरमध्ये सध्या २.२२ टीएमसी साठा आहे.सध्याची स्थिती पाहता धरणे भरण्यासाठी मोठ्या व दमदार पावसाची आवश्यकता आहे. पण पावसाचा पडणारा खंड चिंता करायला लावणारा आहे. तर सोमवारी सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत कोयना परिसरात अवघा २० मिलीमीटर पाऊस झाला आहे.
उरमोडी आणि बलकवडी येथे प्रत्येकी ३ मिलीमीटर पाऊस झाला. इतर धरणक्षेत्रात पावसाने पूर्णपणे उघडीप दिली आहे. त्यामुळे धरणात पाण्याची आवक कमी होत आहे. पावसाने अशीच ओढ दिल्यास आॅगस्ट महिन्यापर्यंत धरणे भरतील, असे सांगण्यात येत आहे.