पाचगणी : परीक्षेसाठी वेळेत पोहचता यावे म्हणून समर्थ महांगडे या विद्यार्थ्याने पॅराग्लायडिंगची मदत घेऊन परीक्षा केंद्र गाठले. शिवाजी विद्यापीठांतर्गत एका महाविद्यालयात तो एमबीएचे शिक्षण घेत आहे. परीक्षेला वेळेवर पोहचण्यासाठी त्याला पॅराग्लायर गोविंद येवले यांची मोठी मदत झाली. याबाबतच व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.पाचगणी येथील समर्थ महांगडे हा एमबीएचे शिक्षण घेतो. त्याची परीक्षा पसरणी येथील एका महाविद्यालयात सुरु आहे. मात्र, वेळापत्रकात झालेल्या बदलाची त्याला कल्पना नव्हती. त्याच्या मित्राने याबाबत त्याला कल्पना दिल्यानंतर पेपर चुकणार या भीतीने तो चिंताग्रस्त झाला.पाचगणी आणि महाबळेश्वर याठिकाणी नेहमी पर्यटकांची वर्दळ असते. त्याबरोबरच वाई येथे परीक्षेला जायचे म्हटल्यावर घाट रस्ता पार करुन जावे लागणार होते. परीक्षेच्या वेळेत आपण पोहचू शकत नाही. हे लक्षात आल्यानंतर त्यांनी पॅराग्लायडिंग ट्रेनर गोविंद येवले यांची भेट घेऊन त्यांना परीक्षा केंद्रावर पोहचण्यासाठी मदत करावी अशी विनंती केली. त्यांनी लगेचच त्याला पॅराग्लायडिंगच्या माध्यमातून परीक्षा केंद्रावर पोहचविले.पेपर सुरु झाला होता. पण, त्याची धडपड पाहून शिक्षकांनीही त्याला प्रवेश दिला. त्यामुळे एमबीए प्रथम वर्षाचा पेपर तो देऊ शकला. पॅराग्लायडिंगच्या माध्यमातून परीक्षा केंद्रावर पोहचण्याचा प्रकार प्रथमच घडत असल्याने याबाबत व्हिडिओ सोशल माध्यमांवर खूपच व्हायरल झाला आहे.
माझी एमबीएची परीक्षा सुरु होती. पण, वेळापत्रकातील बदलाबाबत माहिती नव्हती. परीक्षेला पोहचणे आवश्यक असल्याने मी येवले यांच्याकडे मदत मागितली आणि त्यांनी मला परीक्षा केंद्रावर पोहचण्यासाठी पॅराग्लायडिंगच्या माध्यमातून मदत केली. - समर्थ महांगडे, परीक्षार्थी