महाबळेश्वर : मराठा साम्राज्याच्या देदीप्यमान पराक्रमाचा साक्षीदार असलेल्या प्रतापगडावरील भवानी मातेच्या प्रतिष्ठापनेला यंदा ३५७ वर्षे पूर्ण होत आहे. यानिमित्त गडावर शनिवारी (दि. २३) रात्री ३५७ मशाली पेटविण्यात येणार आहे. मशाल महोत्सवाचा हा अनोखा सोहळा पाहण्यासाठी राज्यभरातील भाविकांची प्रतापगडावर रेलचेल सुरू झाली आहे.
प्रतापगडावरील भवानी माता राज्यभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. नवरात्रोत्सवानिमित्त याठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्निवार, दि. २३ रोजी भवानी मातेची विधीवत पूजा व गोंधळाचा कार्यक्रम होणार आहे. यानंतर सायंकाळी साडेसात वाजता स्वराज ढोल पथकाचे वादन होणार आहे. भवानी मातेच्या प्रतिष्ठापनेला यंदा ३५७ वर्षे पूर्ण होत असल्याने गडावर ३५७ मशाली पेटविण्यात येणार आहे. हस्तकला केंद्राचे चंद्रकांत उतेकर व ग्रामस्थांच्या वतीने मशाल महोत्सवाचे आयोजन केले. ही परंपरा गेल्या सहा वर्षांपासून सुरू आहे.हा अनोखा सोहळा पाहण्यासाठी राज्यभरातील भाविक प्रतापगडावर दाखल झाले आहेत. रविवारी ललित पंचमीच्या दिवशी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.प्रतापगडावर शनिवारी मशाल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, महोत्सवाच्या पूर्वसंध्येला आयोजकांच्या वतीने ३५७ मशाली तयार करण्यात आल्या.