सातारा : गेले महिनाभर चर्चेत असलेल्या सातारा जिल्ह्यातील बहुजन क्रांती मोर्चाला संविधानाचे कोंदण बसविले गेले आहे. त्यामुळे रविवार, दि. १५ जानेवारी रोजी सातारा जिल्ह्यातून निघणाऱ्या ऐतिहासिक मोर्चाला उदंड प्रतिसाद लाभणार आहे. या मोर्चाला सर्व जाती-धर्माचा पाठिंबा मिळाल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.बहुजनांच्या गर्दीपेक्षा दर्दी कार्यकर्त्यांच्या मागणीचा राज्य शासनाला विचार करावा लागणार आहे. या मोर्चाच्या यशामुळे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत दुर्गम परिणाम होणार असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत स्वयंस्फूर्तीने विविध संघटनांनी बहुजन वाड्या-वस्तीत जाऊन आपली रास्त भूमिका विशद केली आहे.मोर्चा यशस्वी करण्यासाठी नंदकुमार वाघमारे, अनिल उबाळे, फारुख पटनी, रमेश चौगुले, हणमंत कारंडे, अमोल गंगावणे, सतीश जाधव, रवींद्र जगताप, सुधीर तुपे व अनेक मान्यवरांनी गेले महिनाभर स्वखर्चाने संपूर्ण सातारा जिल्हा पिंजून काढला आहे. या मोर्चाला अनेकांचे आशीर्वाद लाभले आहेत. ‘बहुजन सर्व, एकच पर्व’ या बॅनरखाली सातारा जिल्हा एकवटलेला आहे, अशीही माहिती यावेळी संयोजकांनी दिली. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरात ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
आज बहुजन क्रांती मोर्चा
By admin | Published: January 15, 2017 12:59 AM