सातारा : खत, बियाणे, औषध या शेतीशी संबंधित साहित्य विक्री करणाºयांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत व निलंबित करण्यात आलेले परवाने पूर्ववत करावेत, यासह इतर मागण्यांसाठी सातारा जिल्हा रासायनिक खते, बियाणे व कीटकनाशके डिलर असोसिएशनतर्फे गुरुवार, दि. २ ते शुक्रवार दि. ४ नोव्हेंबरपर्यंत कृषी साहित्य विक्री दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत.संघटनेतर्फे बुधवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष शशांक शहा, उपाध्यक्ष रणजित निंबाळकर, राजन मामनिया, भूषण शहा, एस. एस. पाटील हे पदाधिकारी उपस्थित होते.यवतमाळ जिल्ह्यातील पिकावर चुकीच्या पद्धतीने कीटकनाशक औषध फवारणीमुळे विषबाधा झाल्याने शेतकरी व शेतमजुरांचे दुर्दैवी मृत्यू झाले. तसेच बरेच शेतकरी व शेतमजूर बाधित झाले आहे. या घटनेला कीटकनाशके विक्रेतेच जबाबदार असल्याचा आरोप केला जात आहे. कृषी साहित्य विक्रेत्यांवर पोलिस कारवाई करून त्यांचे परवाने रद्द करण्यात आले. या परिस्थितीत कृषी साहित्य विक्रेत्यांना आपले व्यवसाय सुरू ठेवणे कठीण झाले आहे.ज्या कृषी निविष्ठा विक्रेत्यांवर चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल झाले आहेत, ते मागे घेण्यात यावेत, निलंबित करण्यात आलेले विक्री परवाने पूर्ववत देण्यात यावेत, आॅनलाईन परवान्यांत समाविष्ट केलेले अर्ज ग्राह्य धरण्यात यावेत. शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या निविष्ठा कायद्याच्या कक्षेत कशा घेता येतील, याचा विचार करण्यात यावा, शासनाकडून सर्व कीटकनाशक उत्पादक कंपन्यांना त्यांचे उगम प्रमाणपत्र, कृषी विक्रेत्यांना देणे बंधनकारक करावे, बियाणे, कीटकनाशके व खते यांचे हस्तलिखित साठा रजिस्टर ऐवजी संगणकीय पद्धतीने ठेवण्यात आलेला साठा रजिस्टर ग्राह्य धरण्यात यावे. दोन दिवस दुकाने बंद ठेवून निषेध नोंदविला जाणार आहे. बेमुदत दुकाने बंद ठेवणे आणि धरणे आंदोलन करणे या एकमेव पर्यायाचा अवलंबला जाईल, असा इशारा देण्यात आला.
जिल्ह्यात आजपासून खत, बियाणे विक्री बंद राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2017 12:57 AM