वाई : महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या मांढरदेवी येथील श्री काळूबाई यात्रेचा २८ रोजी मुख्य दिवस आहे. दरवर्षी या यात्रेसाठी लाखो भाविक मांढरदेव येथे येत असतात. परंतु, चालूवर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व कोरोना रोगाचा संसर्ग वाढू नये म्हणून मांढरदेवी यात्रा रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
पौष महिन्यात म्हणजेच, १४ फेब्रुवारीपर्यंत काळूबाई मंदिर भाविकांना दर्शनासाठी पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे. मांढरदेव मंदिर परिसरात १४४ कलम लागू केले असून, मंदिर परिसरात गर्दी होऊ नये, याची दक्षता पोलीस व प्रशासन घेत आहे. मात्र, देवीची विधीवत पूजा व महाआरती देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त व निवडक पुजारी यांच्या उपस्थितीत होणार आहे. गुरुवार, २८ रोजी देवीचा यात्रेचा मुख्य दिवस. या दिवशी देवस्थान ट्रस्टचे मुख्य प्रशासक न्या. आर. डी. सावंत यांच्या हस्ते सकाळी ६ वाजता देवीची विधीवत पूजा होणार आहे. त्यावेळी मांढरदेव देवस्थानचे चेअरमन न्या. एस. जी. नंदीमठ, प्रांताधिकारी संगीता राजापूरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी शीतल जानवे-खराडे, तहसीलदार रणजित भोसले, विश्वस्त महेश कुलकर्णी, मिलिंद ओक, अतुल दोशी, जीवन मांढरे, चंद्रकांत मांढरे, शैलेश क्षीरसागर, सुधाकर क्षीरसागर, राजगुरू कोचळे, देवस्थानचे सचिव रामदास खामकर, सहसचिव लक्ष्मण चोपडे व निवडक पुजारी उपस्थित राहणार आहेत.
पौष महिन्यात भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी येऊ नये, असे आवाहन पोलीस व प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. दरवर्षी मांढरगडावर लाखो भाविक येत असतात. त्याचबरोबर विविध प्रकारची दुकाने, हॉटेल्स मंदिर परिसरात थाटली जातात; मात्र, यावर्षी बाहेरील कोणत्याही दुकानदाराला मंदिर परिसरात दुकाने थाटण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे मंदिर परिसरात शुकशुकाट आहे.
चौकट...
भाविकांना मंदिराकडे येण्यास नो एन्ट्री !
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी काळूबाई मंदिर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वाईमार्गे एमआयडीसी चौकात तर भोर येथे शिवाजी पुतळ्याजवळ तसेच कोचळेवाडी फाटा येथे पोलीस तैनात केले असून, भाविकांना तेथूनच माघारी फिरविले जात आहे. कोणत्याही परिस्थितीत भाविकांना मंदिराकडे सोडले जात नाही.