सातारा : जिल्ह्यातील प्रत्येक वाडी-वस्ती आणि गावागावांतील मराठा बांधवांच्या नजरा मंगळवार, दि. ३१ जानेवारी रोजी होणाऱ्या चक्काजाम आंदोलनाकडे लागल्या आहेत. गावोगावी बैठकांचा धडाका सुरू झाला असून, ‘खूप लढलो मातीसाठी... एक लढा जातीसाठी...!’ असा नारा देत लाखो मराठा बांधव, भगिनी पुन्हा एकदा चक्काजाम आंदोलनाच्या माध्यमातून एकत्र येणार आहेत. नेमून दिलेल्या ठिकाणी सकाळी अकरा ते दुपारी दोन या वेळेत कोणताही अनुचित प्रकार न करता आपण आपले ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्नशील राहायचे आहे, असे ठरावही गावोगावी झालेल्या बैठकांमध्ये करण्यात आले आहेत. साताऱ्यात वाढे फाटा येथे भजन म्हणत चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक चक्काजामच्या ठिकाणी टाळ-मृदंगाचा गजरही घुमणार आहे.सरकारला आपली ताकद दाखवून देण्याचा एक भाग म्हणून राज्यभरातील मराठा बांधव, मराठा व्यापारी, मराठा युवक-युवती, विद्यार्थी-विद्यार्थिनी मंगळवारी रस्त्यावर उतरणार आहेत. सातारा जिल्ह्यातील लाखो बांधव जवळपास तीसहून अधिक ठिकाणी चक्काजाम आंदोलन करणार असून, त्याची ठिकाणेही निश्चित करण्यात आली आहेत. चक्काजाम आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात होणार असली तरी साताऱ्यात नेमके काय होणार आणि आंदोलनाची दिशा काय असणार याकडे संपूर्ण राज्याच्या आणि खास करून महाराष्ट्र सरकारच्या नजरा लागून राहिल्या आहेत. (प्रतिनिधी)खटाव तालुक्यातही आठ ठिकाणी नियोजनखटाव तालुक्यातील मराठा बांधवही आंदोलनात सहभागी होणार आहेत. त्या अनुषंगाने प्रत्येक वाडी आणि वस्तीवर बैठका झाल्या असून, चक्काजाम आंदोलन कोणत्या ठिकाणी करायचे, हे निश्चित करण्यात आले. पोलिस उपअधीक्षक यशवंत काळे यांच्यासमवेत संयोजकांची बैठक झाली. आंदोलनाची आचारसंहिता काय आहे, याचीही माहिती देण्यात आली. दहिवडीत एकवटणार आज मराठा बांधवदहिवडी : सकल मराठा समाजाच्या वतीने माण तालुक्यातील गावागावांत जाऊन चक्काजाम आंदोलनासाठी दहिवडीत येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दहिवडीतही कार्यकर्त्यांच्या व नेत्यांच्या गाठीभेटी व बैठका घेण्यात आल्या. चक्काजामसाठी येणाऱ्या नागरिकांनी ज्या-त्या रस्त्याला पार्किंग व्यवस्था केली आहे, त्या ठिकाणीच गाड्यांचे पार्किंग करावे. गोंदवले रस्त्याकडून येणाऱ्या गाड्यांचे पार्किंग सिद्धनाथ मंदिराच्या पाठीमागील मैदानात सोय करण्यात आली आहे. पिंगळीकडून येणाऱ्या गाड्यांची सोय हेलिकॉप्टर मैदानात तर बिदाल रस्त्याकडून येणाऱ्या गाड्यांची सोय सार्वजनिक क्रीडा मैदानात करण्यात आली आहे.दहिवडीच्या मुख्य चौकात सर्व बाजूंनी येणारे रस्ते ११ ते १ चक्काजाम करून बंद करण्यात येणार आहेत. या दोन तासांत दोन भजनी मंडळांची भजने होणार आहेत. आंदोलन शांततेच्या मार्गाने होणार आहे. चक्काजाम आंदोलन यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. कायदा व सुव्यवस्था सर्वांनी राखावी, असे आवाहन दहिवडी पोलिस ठाण्याकडून आवाहन करण्यात आले आहे.
मराठा बांधवांचा आज जिल्हाभर चक्काजाम
By admin | Published: January 30, 2017 11:46 PM