भुर्इंज : किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर शनिवारी (दि. २१) राजस्यतरीय किसन वीर चषक कुस्त्या स्पर्धांचे आयोजन केले आहे, अशी माहिती किसन वीर साखर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांनी दिली.प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात मदन भोसले यांनी म्हटले आहे की, किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे आराध्य दैवत श्री माणकाईदेवीची यात्रा १९ व २० रोजी झाली. यानिमित्त किसन वीर सातारा साखर कामगार कल्याण मंडळ व ऊस तोडणी वाहतूक व बैलगाडी कंत्राटदारांच्या सहकार्याने आणि कारखान्याच्या विद्यमाने राज्यस्तरीय किसन वीर चषक कुस्ती स्पर्धा आयोजित केल्या अहेत. एक लाखासाठीच्या खुल्या वजन गटातील कुस्ती शनिवार, दि. २१ रोजी दुपारी दोननंतर रंगणार आहे. विजेत्या प्रथम क्रमांकाच्या मल्लाला चांदीची गदा, एक लाख रुपयांचे बक्षिस देण्यात येणार आहे. तर द्वितीय, तृतीय, चतुर्थ क्रमांकाच्या विजेत्या मल्लांना अनुक्रमे ५१ हजार, २५ हजार, १५ हजार रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले, पहिले हिंद केसरी श्रीपती खंचनाळे, अर्जून पुरस्कार विजेते गणपतराव आंदळकर, दिनानाथ सिंह, दादू चौगुले, योगेश दोडके, विनोद चौगुले यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. बंडा पाटील-रेठरेकर, काका पवार, शिवाजीराव पाचपुते, बापूसाहेब लोखंडे, आप्पासाहेब कदम, विष्णू जोशीलकर, दिनकर सूर्यवंशी, बाळासाहेब लांडगे, रामचंद्र सारंग, उत्तमराव पाटील, रावसाहेब मगर, साहेबराव पवार आदी उपस्थित राहणार आहेत. (वार्ताहर)
राज्यस्तरीय कुस्त्यांचा आज आखाडा
By admin | Published: February 20, 2015 9:55 PM