वेळे : कवठे (ता. वाई) येथील बगाड यात्रा दिनांक १ व २ मे रोजी होणार होती. बावधनची बगाड यात्रा प्रशासनाचे आदेश धुडकावून भरवली होती. त्यामुळे कवठेतील बगाड १ मे रोजी होण्याची शक्यता प्रशासनाला वाटत होती. त्यामुळे प्रशासन चार दिवस सतर्क होते. तहसीलदार रणजित भोसले यांनी कवठे गावातील प्रमुखांच्या दोनवेळा बैठका घेऊन त्यांना बगाड यात्रा न करण्याची सूचना केली होती. त्यानुसार ही यात्रा रद्द केली आहे.
कोरेगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरड, साताऱ्याचे उपजिल्हा पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी गावप्रमुखांच्या बैठका घेतल्या. त्यानंतर शुक्रवार, ३० रोजी पुन्हा भुईंजचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे यांनी सायंकाळी निवडक ग्रामस्थांची बैठक घेतली. त्यानंतर ग्रामस्थांनी कोणत्याही परिस्थितीत बगाड काढणार नसल्याचे व प्रशासनाला सहकार्य करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर हा पेच सुटला.
दरम्यान, वाई तालुक्यासह जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची वाढत असलेली संख्या व त्यामुळे उद्भवत असलेली चिंताजनक परिस्थिती लक्षात घेता, कवठे ग्रामस्थांनी प्रशासनाला सहकार्य करत ही बगाड यात्रा रद्द केली असल्याचे जाहीर केले. कवठे यात्रा रद्द झाल्याने परिसरातील अन्य गावातील लोकांनी कवठे गावामध्ये प्रवेश करू नये, असेही आवाहन केले आहे. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील कांबळे यांनीही प्रशासन आपल्याला सहकार्य करेल, असे आश्वासन दिले आहे.