सातारा : जिल्ह्यात ऊस वाहतूक वाहनांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी ‘लोकमत’ने पुढाकार घेतला असून, ऊस वाहतूक वाहनांना सामाजिक संस्थांच्या सहकार्यातून रेडियम बसविण्यात येणार आहेत. साताºयातील ‘वात्सल्य सामाजिक सेवाभावी संस्था अन् धर्मवीर युवा मंच’कडून या मोहिमेस दि. २ पासून सुरुवात होत आहे.
सध्या जिल्ह्यातील उसाचा गळीत हंगाम जोरात सुरू आहे. त्यासाठी ऊस भरून हजारो वाहने साखर कारखान्याकडे धावत आहेत. जिल्ह्यात आज सुमारे १५ साखर कारखाने असून, पाच हजारांहून अधिक वाहनांतून ऊस वाहतूक केली जात आहे. दिवसा तसेच रात्रीची ही वाहतूक करण्यात येत आहे. मात्र, रात्रीच्या सुमारास होणारी उसाची वाहतूक धोकादायक ठरत आहे. कारण अनेक ऊस वाहतूक वाहनांना रिफ्लेक्टर नसल्यामुळे रात्रीच्या वेळी पाठीमागून जाऊन वाहने धडकत आहेत. त्यामुळे अपघातात वाढ होत आहे.
रिफ्लेक्टर किंवा रेडियम वाहनांना पाठीमागील बाजूस, अॅक्सलला लावल्यास मागील वाहनधारकांना पुढील अंदाज येऊ शकतो; पण अनेक ऊस वाहतूक वाहनांना रेडियम किंवा रिफ्लेक्टर नाहीत. परिणामी गेल्या दीड महिन्याच्या काळात जवळपास लहान-मोठे पाच अपघात असे झाले असून, त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत.
यामुळे अपघात टाळण्यासाठी उपाययोजनांची गरज निर्माण झाल्याने ‘लोकमत’ने यासाठी पुढाकार घेतला आहे.या पुढाकारातूनच साताºयातील वात्सल्य सामाजिक सेवाभावी संस्था, धर्मवीर युवा मंचने या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यासाठी या संस्थांनी ऊस वाहतूक वाहनांसाठी रेडियम पुरविणे व लावण्यासाठी पुढाकार घेतला आहे. वात्सल्य सामाजिक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष शशिकांत पवार, उपाध्यक्ष रणजित सावंत, सचिव प्रवीण कासकर आणि धर्मवीर युवा मंचचे अध्यक्ष प्रशांत नलवडे हे प्रयत्नशील आहेत. त्यांच्या माध्यमातून वाहनांच्या अॅक्सलला रेडियम लावण्यात येणार आहे.
सातारा परिसरातून मंगळवार, दि. २ रोजी या मोहिमेला सुरुवात होणार आहे. त्यावेळी ऊस वाहतूक वाहनांबरोबरच इतर वाहनांना रेडियम लावण्यात येणार आहे. त्यामुळे संभाव्य दुर्घटना टळण्यास मदत होणार आहे.तसेच सातारा शहरातील देगाव फाटा येथील जगदंब क्रिएशन आणि पी. के. सेल्स येथेही वाहनधारकांसाठी रेडियम मोफत देण्याची व्यवस्था या संस्थांनी केली आहे. या संस्थांच्या माध्यमातून अधिकाधिक वाहनांना रेडियम लावण्याचा प्रयत्न आहे. या सामाजिक कार्यात सहभागी होण्यासाठी अनेकजण पुढे येत आहेत.शेतकºयांचाच फायदा होणार...ऊस वाहतूक वाहनांचा अपघात झाला तर पोलिसांत तक्रार करणे, घटनास्थळाचा पंचनामा करणे यामध्ये अनेक तास निघून जातात. त्यामुळे वाहनातील उसाचे वजन कमी होते. परिणामी शेतकºयांना याचा फटका बसतो; पण वाहनांना रेडियम लावल्यानंतर अपघात टळण्यास मदत होणार आहे. एकंदरीतच साखर कारखान्यापर्यंत वेळेत ऊस गेल्यास त्याचा फायदा शेतकºयांनाच होणार आहे.
रात्रीच्या वेळी ऊस वाहतूक सुरू असते. त्यावेळी अनेक वाहनांना रिफ्लेक्टर किंवा रेडियम लावलेले नसते. त्यामुळे पाठीमागून भरधाव येणारे वाहन अशा वाहनावर जाऊन धडकते व अपघात होतो. गेल्या तीन वर्षांच्या काळात अशा अपघातात सुमारे ४० हून अधिक जणांना प्राणास मुकावे लागले आहे. असे अपघात टाळण्यासाठी ऊस वाहतूक वाहनांना रेडियम लावण्याचा निर्णय घेतला आहे.- शशिकांत पवार, अध्यक्ष वात्सल्य सामाजिक सेवाभावी संस्थाकैक टन ऊसाचं वजन पेलणाºया अशा अनेक ट्रॉलीज केवळ रेडियम नसल्यामुळे लोकांच्या जीवावर उठल्या आहेत.