सातारा : पालिकेच्या आरोग्य विभागात टेंडर पद्धतीने, रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारास डेंग्यूसदृश आजाराची लागण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाची तातडीची बैठक सोमवारी (दि. २५) सकाळी अकरा वाजता पालिकेत आयोजित करण्यात आली आहे. आरोग्य सभापती रवींद्र झुटिंग यांनी ही माहिती दिली. आरोग्य विभागात काही कायमस्वरूपी तर काही ठेकेदाराचे रोजंदारीवरील कर्मचारी काम करतात. त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना पुरेशा नसल्याने रोहित दीपक विरकायदे या रोजंदारीवरील कर्मचाऱ्यास डेंग्यूसदृश आजाराची लागण झाल्याचा संशय आहे. त्याच्या चाचण्या घेण्यात आल्या असल्या, तरी डेंग्यूची लागण त्याला झाली आहे अथवा कसे, याबाबत चाचण्यांच्या अहवालानंतरच माहिती मिळू शकेल, असे झुटिंग यांनी सांगितले. ‘कचरा उचलणाऱ्या कर्मचाऱ्यास अशा स्वरूपाच्या घातक आजाराची लागण होत असेल, तर नागरिकांच्या आणि इतर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही विचारविनिमय करणे आवश्यक बनले असून, त्यासाठीच बैठक आयोजित करण्यात आल्याचे ते म्हणाले. रोहित विरकायदे या सफाई कर्मचाऱ्यास उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या निमित्ताने आरोग्य कर्मचाऱ्यांना पुरविण्यात येणाऱ्या सुविधांचा विषय ऐरणीवर आला आहे. पायातील गमबूट, हातमोजे आणि इतर साहित्य कर्मचाऱ्यांप्रमाणे रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांना पुरविण्यात येतात का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. विरकायदे याच्या आजाराचे स्वरूप लक्षात आल्यावरच त्याविषयी भाष्य करणे उचित ठरेल, असे आरोग्य सभापतींनी सांगितले. तथापि, अशा घातक आजारांचा फैलाव शहरात सुरू होण्यापूर्वी खबरदारीच्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने विरकायदे याला झालेल्या आजाराची गंभीर दखल घेतली जाईल आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाय योजण्यात येतील, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)
आरोग्य विभागाची आज बैठक
By admin | Published: January 25, 2016 12:48 AM