सातारा : लोखंडी पाइपला साडी बांधून झोका खेळत असताना त्यात मान अडकून नऊ वर्षांच्या चिमुकलीचा फास लागून दुर्दैवी मृत्यू झाला. पोर्णिमा शंकर फाळके (वय ९, रा. तडवळे, ता. खटाव) असे मृत चिमुकलीचे नाव आहे. ही घटना खटाव तालुक्यातील तडवळे येथे काल, रविवारी (दि. १९) घडली. या घटनेने तडवळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पोर्णिमा ही त्यांच्या घरामध्ये झोका खेळत होती. तिने लोखंडी पाइपला साडी बांधली होती. या साडीमध्ये बसून ती झोका खेळत होती. त्याचवेळी खेळता-खेळता अचानक तिची मान साडीमध्ये अडकून तिच्या गळ्याला फास लागला. तिने आरडाओरड केल्यानंतर हा प्रकार घरातल्यांच्या निदर्शनास आला. यानंतर घरातल्यांनी तिच्या मानेचा फास सोडवून तिला तातडीने वडूज, ता. खटाव येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. अशा प्रकारे चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने तडवळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शंकर पोपट फाळके (वय ४०, रा. तडवळे, ता. खटाव, जि. सातारा) यांनी वडूज पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, महिला पोलिस हवालदार एस. एल. वाघमारे या अधिक तपास करीत आहेत.
झोका खेळत असताना गळफास लागून चिमुकलीचा मृत्यू, साताऱ्यातील तडवळेतील दुर्दैवी घटना
By दत्ता यादव | Published: March 20, 2023 2:27 PM