नितीन काळेल ।सातारा : राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी असली तरी जिल्ह्यात मात्र राष्ट्रवादीने कधीच ही भूमिका बजावली नाही. त्यामुळे काँग्रेसला गेल्या १७ वर्षांत जिल्हा परिषदेतील सत्तेत वाटा मिळाला नाही. आता पुन्हा एकदा काँग्रेसकडून जिल्हा परिषदेतील सत्तेत सन्मान द्या, अशी भाषा सुरू झाली आहे. त्यामुळे काँग्रेसची ही आक्रमक भूमिका येणाऱ्या काळात राष्ट्रवादीसाठी नक्कीच डोकेदुखी ठरू शकते.ग्रामीण भागाचा कणा म्हणून जिल्हा परिषदेकडे पाहिले जाते.
याच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेकांनी सदस्य होत विधानसभेची पायरीही चढली आहे. त्यामुळे नवे नेतृत्व घडविणारी कार्यशाळा म्हणूनही जिल्हा परिषदेकडे पाहिले जाते. अशाचप्रकारे सातारा जिल्हा परिषदेनेही काही आमदारांना घडविले. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने विधानसभाही दणाणून सोडली. याच जिल्हा परिषदेत गेल्या १७ वर्षांपासून सत्तेचा लंबक हा राष्ट्रवादीच्या बाजूनेच राहिला. त्या तुलनेत विरोधी पक्ष असणारे शिवसेना आणि भाजप हे दूरच राहिले. असे असलेतरी राज्यात आघाडीत असणाऱ्या काँग्रेसलाही राष्ट्रवादीने कधीच स्थान दिले नाही. सतत मागच्या बाकावर बसविण्याचा विडाच राष्ट्रवादीने उचलला. तर वारंवार सत्तेत वाटा देण्याची मागणी करूनही राष्ट्रवादीने काँग्रेसला वाटाण्याच्या अक्षता लावल्या. त्यामुळे १७ वर्षांत काँग्रेसचा एकही सदस्य सभापतिपदापर्यंतही गेला नाही; पण आता काँग्रेसने पुन्हा जिल्हा परिषदेतील सत्तेत सन्मानाने वाटा देण्याची भाषा सुरू केली आहे.
काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी दीड महिन्यापूर्वी घेतली. तेव्हापासून काँग्रेसने आक्रमक रूप धारण केले आहे. साताºयात काँग्रेस कमिटीत झालेल्या पहिल्याच मेळाव्यात आमदार जयकुमार गोरे यांनी विधानसभेला जिल्ह्यातील चार जागा मिळविण्याची भाषा सुरू केली. तर आता जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे जिल्ह्यात बैठका घेत आहेत. या बैठकांमधून काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते जिल्हा परिषदेतील सत्तेत वाटा घ्या, अशी भाषा करू लागले आहेत. त्यामुळे निंबाळकर यांनीही सत्तेत वाटा मिळवायचा, असा निर्धार केला आहे.ताणून धरणार की गळ्यात गळे...सत्तेत तुम्हीच राहायचे, आघाडी धर्म आम्ही पाळायचा, हे आता चालणार नाही. त्यासाठी आता जिल्हा परिषदेतही आम्ही वाटा मागतो. नाहीतर येणाºया निवडणुकीत पक्षाची भूमिका वेगळी असेल, असे सांगण्यासही काँग्रेसचे पदाधिकारी कचरत नाहीत. त्यामुळे काँग्रेसच्या या आक्रमकतेपुढे राष्ट्रवादी किती ताणून धरणार का गळ्यात गळे घालणार, हे येणारा काळच ठरविणार आहे.गायत्रीदेवी राष्ट्रवादीच्या पहिल्या अध्यक्षा...गेल्या १७ वर्षांत जिल्हा परिषदेचे ८ अध्यक्ष झाले. हे सर्व राष्ट्रवादीचे होते. नारायणराव पवार हे काँग्रेसचे शेवटचे अध्यक्ष ठरले. पवार यांच्यानंतर गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी या अध्यक्षा झाल्या. तर आता संजीवराजे नाईक-निंबाळकर हे अध्यक्ष आहेत.
राज्यात, देशात आघाडी चालते; पण साताºयात नाही. वरिष्ठांनी कधीतरी याकडे लक्ष द्यावे. कारण, गेल्या १७ वर्षांत काँग्रेस जिल्हा परिषदेत सत्तेत नाही. आघाडी धर्मासाठी राष्ट्रवादीने सन्मानाने सभापतीचे एक पद तरी द्यावे.- भीमराव पाटील, सदस्य जिल्हा परिषदकाँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी आहे; पण सातारा जिल्ह्यात आघाडी धर्म कोठे आहे.? प्रत्येकवेळी आम्हीच पालखीचे भोई व्हायचे, हे बंद झाले पाहिजे. त्यासाठी आता विधानसभेला जिल्ह्यातील चार जागा आणि जिल्हा परिषदेतील सत्तेत वाटा द्या, हीच आमची भूमिका राहणार आहे.- रणजितसिंह नाईक-निंबाळकर, जिल्हाध्यक्ष काँग्रेस