पाटण : तारळे विभागातील कुशी पुनर्वसित या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षिकांनी स्वच्छतेचे काम करण्यास भाग पाडले, अशी तक्रार पंचायत समितीच्या मासिक सभेत करण्यात आली. या प्रकाराची तातडीने चौकशी करून त्या दोन्ही शिक्षिकेवर कारवाई करा, अशी जोरदार मागणी करण्यात आली.
सभापती राजाभाऊ शेलार यांच्या अध्यक्षतेखाली पाटण पंचायत समितीची मासिक सभा शुक्रवारी पार पडली. या सभेत महिला सदस्या रेश्मा जाधव यांनी तारळे विभागातील कुशी पुनर्वसित या प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे काम दोन महिन्यांपासून दिले जाते, अशी तक्रार केली. यावर प्रभारी गटशिक्षणाधिकारी दीपाली बोरकर म्हणाल्या, याबाबतची तक्रार आली असून चौकशी करून अहवाल पाठविला जाणार आहे.
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. बी. पाटील म्हणाले, तालुक्यात २ हजार २८९ लोकांना कोरोना झाला. सात दिवसांत २२ रुग्ण सापडले आहेत. तसेच आतापर्यंत २२ हजार ७०६ लोकांच्या चाचण्या केल्या. मारुल तर्फ पाटण येथील गॅस्ट्रोच्या साथीमुळे एका बालिकेचा बळी गेला तर ९४ लोकांना गॅस्ट्रोची बाधा झाली आहे.
गॅस्ट्रोची साथ पसरण्याचे मुख्य कारण म्हणजे, दोन महिने तेथील पिण्याच्या पाण्याची टाकी साफ करण्यात आली नव्हती, अशी माहिती सभापती राजाभाऊ शेलार यांनी दिली.
येराड अंगणवाडी इमारतीचे काम झाले आहे, अशी तक्रार सदस्या उज्ज्वला लोहार यांनी केली. नावडी येथील शाळेच्या इमारतीचे कामसुद्धा निकृष्ट झाले आहे, अशी तक्रार करण्यात आली आहे.
मल्हार पेठ येथील घनकचरा प्रकल्प दुरुस्त करण्यासाठी निधी द्यावा, अशी मागणी सदस्य सुरेश पानस्कर यांनी केली तसेच घनकचरा जाळल्यामुळे शेजारी असलेल्या आंबा आणि पेरूच्या बागांचे जळून नुकसान झाल्याची तक्रार संबंधित शेतकऱ्यांनी केली आहे. पाटण आगाराच्या वाहतूक नियंत्रण कक्षात प्रवाशांना उलटसुलट उत्तरे दिली जातात, अशी तक्रार सीमा मोरे यांनी केली.
पाटण तालुक्यातील सव्वाशे गावांचे पिण्याच्या पाण्याचे टंचाई प्रस्ताव पाठविले आहेत. विंधन विहीर दुरुस्ती, टँकर मागणी इत्यादीबाबतही कार्यवाही सुरू आहे, असे सांगण्यात आले. नारळवाडी येथील घरकुल योजनेत भेदभाव झाला असून तेथील १९ महिलांनी गावातील घरकुल योजनेचा फेरसर्वेक्षण करावा, अशी मागणी केल्याची माहिती सुरेश पानस्कर यांनी दिली.
सध्या शाळा बंद असल्या तरी विद्यार्थी शाळेच्या प्रक्रियेत असलेच पाहिजे, अशी अपेक्षा सभापती राजाभाऊ शेलार यांनी व्यक्त केली. तसेच शाळेमध्ये ५० टक्के शिक्षकांची उपस्थिती दिसून येत नाही. आता येथून कोणत्याही दहा गावांच्या सरपंचांना मोबाईलवरून संपर्क साधून तेच सांगतील की, शिक्षक शाळेत येतात की नाही, अशी तक्रार सदस्य संतोष गिरी यांनी केली.
मासिक सभेस गटविकास अधिकारी प्रकृती ठीक नसल्यामुळे गैरहजर होते.
चौकट
हाय मॉस म्हणजे काय रे भाऊ ?
मासिक सभेत सुरुवातीपासून शेवटपर्यंत ‘हाय मॉस’ या विषयावर चर्चा रंगली. याबाबत सभापती राजाभाऊ शेलार यांनी ‘हाय मॉस’साठी खर्च करण्यास असमर्थता दर्शविली. तर इतर सदस्यांनी हाय मॉसमुळे डोंगराळ भागातील गावे रात्री-अपरात्री प्रकाशमान होतील तेव्हा हाय मॉससाठी निधी खर्च केला पाहिजे, असा आग्रह धरला. मात्र, त्याऐवजी विकासकामावर निधी टाकला तर त्याचा फायदा होईल, असे सभापती शेलार म्हणाले. मात्र, शेवटपर्यंत हाय मॉस म्हणजे काय हे बऱ्याच जणांना सविस्तर कळलेच नाही.