महाबळेश्वर : महाबळेश्वरच्या टोल एकत्रिकरण प्रकरणात आजपर्यंत अलिप्त राहिलेल्या भारतीय जनता पार्टीने आता या प्रकरणात उडी घेतली आहे. भाजपाचे माजी जिल्हा चिटणीस व माजी नगरसेवक रवींद्र कुंभारदरे यांनी हे प्रकरण थेट वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कोर्टात पोहोचविले असून, वन खात्याने सुरू केलेल्या दुहेरी टोल संदर्भात विचार विनिमय करण्यासाठी मुंबई येथे मंत्रालयात दि. १ आक्टोबर रोजी दुपारी १ वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.वन विभागाने विविध पॉइंटवर वन व्यवस्थापन समिती स्थापन करून सुरुवातीला प्रती वाहन १० रुपयांप्रमाणे टोल वसुलीस प्रारंभ केला होता. पर्यटकांना त्याची सवय झाल्यानंतर त्यांनी प्रती व्यक्ती १० रुपये वसूल करण्यास सुरुवात केली व या पॉइंटची देखभाल सुरु केली. त्यामुळे अनेक पॉइंटवर टोल वसुली करताना वाहनांची कोंडी होऊ लागली. परिणामी पर्यटकांना अनेक अडचणी येऊ लागल्या. त्यामुळे अनेकजण एकाच ठिकाणी टोल वसूल करावा, असा आग्रह धरत होते. त्याप्रमाणे वन विभाग व नगरपालिकेने एकाच ठिकाणी टोल वसूल करावा यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले. परंतु या बैठकीमध्ये कोणी किती पैसे घ्यायचे यावरून एकमत झाले नाही. त्यामुळे वन विभागाने वेण्णा लेकवर आपला स्वतंत्र टोल बुथ बुुधवारी सुरू केला. या टोल वसुलीला विरोध दर्शवत स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद करून शहरात मोर्चा काढला होता.या प्रकरणातील गुंता सोडविण्यासाठी एकीकडे शिवसेना तर दुसरीकडे राष्ट्रवादी प्रयत्नशील असतानाच भाजप कार्यकर्ते मात्र शांत होते. आता या दोन्ही नेत्यांनी योग्य प्रकारे मध्यस्थिची भूमिका न बजावल्याने भाजपाचे जिल्हा माजी चिटणीस व माजी नगरसेवक रवींद्र्र कुंभारदरे यांनी भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी यांच्या मार्फ त या प्रकरणात मध्यस्थी करण्याची विनंती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना केली आहे. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी मंत्रालयात दि. १ आॅक्टोबर रोजी दुपारी १ वाजता या प्रकरणाशी संबंधित सर्व प्रमुखांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत आता काय निर्णय होतो, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)
टोल एकत्रिकरणाचा चेंडू आता वनमंत्र्यांच्या कोर्टात
By admin | Published: September 30, 2016 11:59 PM