सातारा : पुणे-बंगळूरू महामार्गावरील आनेवाडी आणि तासवडे टोलनाक्यावर अन्यायकारक टोलवसुली सुरू आहे. याठिकाणी सातारा जिल्हावासीयांना टोलमाफी झालीच पाहिजे, या मागणीसाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाने आनेवाडी टोलनाक्यावर ठिय्या मांडला. यामुळे जवळपास अर्धातास महामार्ग थांबल्याने वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. मात्र, संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्याने आठ दिवसांत तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले.सातारा जिल्ह्यातून पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग जात आहे. या मार्गावर सातारा जिल्ह्यात आनेवाडी आणि तासवडे येथे दोन टोलनाके आहेत. सातारच्या नागरिकांना जिल्हांतर्गत कोठे जायचे झाल्यास तसेच कमी अंतरासाठी जायचे म्हटले तर अन्यायकारक अशी टोलची रक्कम भरावी लागते. ही सातारकर नागरिकांची एकप्रकारे लूट आहे. या कारणाने स्थानिक नागरिक आणि टोल प्रशासनामध्ये वारंवार वाद होतात.वास्तविक एका बाजुला रस्त्याचा कर भरून घेतला जात असताना मागील २० वर्षांपासून अन्यायकारकपणे टोल घेतला जात आहे. त्यामुळे यापुढे जिल्ह्यातील वाहनांना टोलमाफीतून वगळावे, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. तसेच टोलमाफी न झाल्यास १५ जानेवारीला आनेवाडी टोलनाक्यावर ठिय्या मांडण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर प्रशासकीय पातळीवर काहीच हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी आनेवाडी टोलनाक्यावर ठिय्या मांडण्यात आला.सोमवारी सकाळी ११ पासून जिल्ह्यातून शिवसैनिक आनेवाडी टोलनाक्यावर जमा होऊ लागले. यावेळी जय भवानी, जय शिवाजी’, अन्यायकारक टोलमाफी झालीच पाहिजे अशी घोषणाबाजी शिवसैनिक करत होते. दुपारी साडेबाराच्या सुमारास आनेवाडी नाक्यावर साताऱ्याच्या बाजुला शिवसैनिकांनी ठिय्या मांडला. टोलमाफी घेतल्याशिवाय मागे फिरणार नाही, असा पवित्राही सर्वांनी घेतला. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पण, मागणी मान्य झाल्याशिवाय माघार घेणार नसल्याचे शिवसैनिकांनी सांगितले.यामध्येच जवळपास अर्धा तास गेला. यामुळे महामार्गावरील सर्व सहा लेनवरील वाहतूक थांबली होती. परिणामी दोन्ही बाजुला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. प्रवाशांचा खोळंबा झाला. तरीही शिवसैनिक एेकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. यादरम्यान, संबंधित कंपनीचे अधिकारी आले आणि त्यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. बराचवेळ चर्चा झाल्यानंतर याबाबत बैठक घेऊन निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर शिवसेनेने आंदोलन तात्पुरते मागे घेतले.या आंदोलनात जिल्हा समन्वयक रामदास कांबळे, ज्येष्ठ नेते सुधीर राऊत, युवासेना जिल्हाप्रमुख माऊली पिसाळ यांच्यासह अजित यादव, विश्वनाथ धनवडे, निमीष शहा, सागर रायते, नितीन गोळे, सचिन झांझुर्णे, गणेश जाधव, रियाज शेख, इम्रान बागवान, सागर धोत्रे, तेजस पिसाळ, विलास भणगे, राजाभाऊ गुजर, माऊली शेलार, माऊली गोळे, संतोष चव्हाण यांच्यासह शेकडो शिवसैनिक सहभागी झाले होते.
Satara: टोलमाफी झालीच पाहिजे; शिवसेना ठाकरे गटाचा आनेवाडी टोलनाक्यावर ठिय्या, वाहतूक विस्कळीत
By नितीन काळेल | Published: January 15, 2024 3:32 PM