कोपर्डे हवेली : सध्या लाॅकडाऊन असल्याने सर्वच उद्योग व्यवसायावर त्याचा परिणाम झालेला दिसून येत आहे. भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनाही त्याचा फटका बसला आहे. सर्वात जास्त उत्पादन खर्चाचे पीक म्हणून टोमॅटो पिकाकडे पाहिले जाते. उन्हाळी हंगामात टोमॅटोच्या लागणी झाल्या. ते पीक आता जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार असल्याने आणि लाॅकडाऊनची भीती असल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी चिंतेत आहे.
तिन्ही हंगामांच्या तुलनेत उन्हाळी हंगामात टोमॅटोचे लागवडीचे क्षेत्र जादा असते. दरही चांगला भेटत असल्याने उत्पादन खर्च जादा करून शेतकरी चांगले पीक आणतात. मार्च, एप्रिल महिन्यात शेतकरी टोमॅटोची लागवड करतात. त्याचे उत्पादन जून महिन्यात सुरू होते. पुणे, अहमदाबाद, मुंबई, बेळगाव आदी बाजारपेठेत टोमॅटो पीक विक्रीसाठी पाठवले जाते. स्थानिक बाजारपेठेत काही शेतकरी टोमॅटो विक्रीसाठी पाठवतात. पण, त्याला मर्यादा असते. कराड, चिपळूण या ठिकाणी काही शेतकरी टोमॅटो विक्रीसाठी पाठवतात.
मुंबईत टोमॅटोला मागणी चांगली असल्यामुळे कराड तालुक्यातील शेतकरी इतर बाजारपेठेच्याऐवजी मुंबईला टोमॅटो पाठवतात. उन्हाळी हंगामात घेतलेल्या टोमॅटो पिकाचा उत्पादन खर्च एकरी दीड ते दोन लाखापर्यंत असतो. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन असल्याने जून महिन्यात तो आनलाॅक होईल का ? याविषयी शेतकरी विचारात आहे. शेतकऱ्यांच्या भाजीपाला पिकासाठी वाहतूक सुरू असली तरी तरी त्याला मर्यादा पडत आहेत. सध्या काही ठिकाणच्या लहान मोठ्या भाजी मंडई बंद असल्याने त्याचा तोटा शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. लाॅकडाऊनमुळे अनेक कार्यक्रम तसेच हाॅटेल व्यवसाय बंद असल्याने भाजीपाला व्यवसाय तोट्यात सुरू आहे. सर्वात जास्त उत्पादन खर्च करून टोमॅटोचे पीक शेतकरी घेतात. त्यामुळे या लाॅकडाऊनची चिंता सतत शेतकऱ्यांना सतावत आहे.
कोट
आम्ही प्रत्येक वर्षी उन्हाळी हंगामात टोमॅटोचे उत्पादन घेत असतो. प्रत्येक वर्षी उत्पादन खर्चात वाढ होत आहे. सध्या लाॅकडाऊन असल्याने आमच्या चिंतेत भर पडली आहे. यंदा दोन एकर क्षेत्रावर टोमॅटोचे पीक घेतले आहे. त्याला तीन लाखांपेक्षा अधिक खर्च झाला आहे. भविष्यात लाॅकडाऊन राहिले तरी शेतकऱ्यांच्या मालाची विक्रीच्या व्यवस्थेसाठी शासनाने नियोजन करावे.
भाऊसाहेब चव्हाण, टोमॅटो उत्पादक शेतकरी
कोपर्डे हवेली
चौकट
कराड तालुक्यात कोपर्डे हवेली, नडशी, पार्ले, विंग, काले, शिरवडे, उत्तर कोपर्डे आदी गावातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उन्हाळी हंगामात टोमॅटोचे उत्पादन घेत असतात.