आदर्की : कोरोना महामारी, लॉकडाऊनमुळे बाजारपेठा बंद असल्याने टोमॅटो पिकाला कवडीमोल दरामुळे आदर्की परिसरातील शेतकऱ्याचे कोट्यवधी रुपयाचे नुकसान झाले आहे. आदर्की परिसरातील टोमॅटोच्या बागा झाल्या लालेलाल. मात्र, शेतकरी कंगाल झाल्याने शासनाने भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
फलटण तालुक्याच्या पश्चिम भागातील आदर्की परिसरात वीस वर्षांपासून टोमॅटो रोपांची लागवड करत आहेत, परंतु आठ वर्षांपूर्वी धोम-बलकवडी उजव्या कालव्यातून आदर्की परिसरात पाणी आल्याने बागायती शेत्रात वाढ झाली. त्या प्रमाणात टोमॅटो लागवड क्षेत्रात वाढ झाली, पण गुढीपाडव्याला लागण केलेल्या टोमॅटोला चांगला भाव मिळत होता. गतवर्षी कडक लॉकडाऊन असूनही भाव बऱ्यापैकी मिळाल्याने शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागला नाही.
लॉकडाऊनमुळे नोकरी गमावलेले चाकरमानी व शेतकऱ्यांनी मार्च महिन्यात टोमॅटोसाठी नांगरणी करून शेणखते टाकली व सरी काढून टोमॅटोची लागवड केली. या वर्षी पाणी उपलब्ध असल्याने आदर्की खुर्द, आदर्की बुद्रुक, आळजापूर, कापशी, हिंगणगाव आदी गावांत वीस ते पंचवीस लाख रोपांची लागवड केली. त्यावेळी रोपवाटिकेतून एक ते दीड रुपयाला रोप शेतकऱ्यांनी विकत घेऊन लागवड केली. त्यानंतर, सेंद्रिय व रासायनिक खते टाकून रोपांना भर लावणे, रोपांना आधार देण्यासाठी काठी, तारा, सुतळ्यांचा वापर करावा लागतो.
या वर्षी वातावरणातील बदलामुळे विविध औषधांवर जादा खर्च झाला. यासाठी चाळीस गुठ्यांसाठी एक ते दीड लाख रुपये खर्च झाला, पण लॉकडाऊनमुळे विवाह सोहळे, राजकीय मेळावे, पालखी सोहळे व बाजारपेठा बंद राहिल्याने टोमॅटोचा प्रति किलो दोन ते सात रुपये दर राहिल्याने, शेतकऱ्याच्या हातात खर्च वजा जाता काही न मिळाल्याने शेतकऱ्यांनी तोडणी बंद केली. टोमॅटोच्या बागा लालेलाल दिसत आहेत, तर हातात काही न मिळत असल्याने शेतकरी कंगाल झाल्याने टॉमेटो पिकांचे पंचनामे करण्याची मागणी होत आहे.
(चौकट)
४० गुंठ्यासाठी सव्वा लाख खर्च...
टोमॅटो पिकासाठी खर्च एक रोप १ रुपया ३० पैसे, तार १४० रुपये किलो, सुतळी १३० रुपये किलो, काठी ७ ते १२ रुपये एक नग, मशागत, खते, औषधे मिळून ४० गुंठ्यासाठी एक ते सव्वा लाख खर्च येत असतो.
(कोट...)
आदर्की परिसरात टोमॅटोची लागवड दराच्या आशेवर केल्यास हमखास दर मिळत असल्याने कष्टाचे चीज होत होते, परंतु गेल्या वर्षापासून शेती व्यवसाय संकटात सापडला आहे. कोरोनामुळे शेतकऱ्यांनी टोमॅटो पिकासाठी लाखो रुपये खर्च करूनही दर मिळत नाही, तरी शासनाने पिकांचे पंचनामे करून भरपाई द्यावी.
- उदय निंबाळकर, शेतकरी, आदर्की खुर्द.
10आदर्की
फोटो - आदर्की परिसरात दराअभावी शेतकरी टोमॅटो फेकून देत आहेत. (छाया: सूर्यकांत निंबाळकर)