कऱ्हाड : चले जाव मोर्चाच्या स्मृतिदिनानिमित्त मंगळवार, दि. २४ रोजी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची महिती स्मारक समितीचे विश्वस्त ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी दिली.
राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या ‘भारत छोडो’ या आंदोलनाचा एक भाग म्हणून यशवंतराव चव्हाण यांच्या कल्पनेतून स्वातंत्र्यसैनिक दादा उंडाळकर यांनी कऱ्हाडच्या तहसील कार्यालयावर २४ ऑगस्ट १९४२ रोजी मोर्चा काढला. त्यामध्ये त्यांना अटक व तुरुंगवास झाला. या मोर्चाच्या आठवणी जागृत ठेवून त्यांना आदरांजली वाहण्यासाठी दादा उंडाळकर स्मारक समितीच्यावतीने विजय स्मृतिस्तंभ व अर्धाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यात येते. यंदाही मंगळवार, दि. २४ रोजी सकाळी दहा वाजता अभिवादन करण्यात येणार आहे.
स्वातंत्र्यदिनाचा अमृत महोत्सव साजरा झाला आणि स्वातंत्र्यलढ्यातील अग्रणी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे पुण्यतिथी शताब्दी वर्ष नुकतेच संपले. हे औचित्य साधून स्मारक समितीच्यावतीने लोकमान्य टिळक यांच्या जन्मशताब्दी वर्षामध्ये के. भागवत व ग. प्र. प्रधान यांनी इंग्रजीत लिहिलेल्या चरित्र ग्रंथाचा अवधूत डोंगरे यांनी मराठीत अनुवाद केला आहे. या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा सोमवार, दि. २३ रोजी संत साहित्याचे अभ्यासक प्रा. डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते होणार आहे. ‘भारताचा स्वातंत्र्यलढा’ या विषयावर त्यांचे व्याख्यानही होणार आहे. बसस्थानकासमोरील गुंजन हॉलमध्ये दुपारी तीन वाजता हा कार्यक्रम होईल. त्याला उपस्थित राहण्याचे आवाहन उंडाळकर यांनी केले आहे.