म्हसवड : माण तालुक्यातील एका गावातील पाच वर्षांच्या चिमुरडीवर जवळच्याच नातेवाइकाने अत्याचार करून तिला तिच्या गावी आणून सोडले. या प्रकरणी संबंधित नातेवाइकासह इतर दोन महिलांवर आरोपीला मदत केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकारामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
माण तालुक्यातील एका गावात पाच वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करण्यात आला. त्यानंतर शुक्रवार, दि. १ जून रोजी रात्री साडेसातच्या सुमारास गावातील व्यायामशाळेजवळील स्मशानभूमी येथे रस्त्याकडेला पीडित मुलगी व तिच्या बहिणीला चारचाकी गाडीतून सोडून आरोपी निघून गेला. यावेळी गावातील व्यायामशाळेजवळ बसलेल्यांना लहान मुलगी ओरडत असल्याचा आवाज आला. आवाजाच्या दिशेने लोक गेले असता अंधारात एक मुलगी ओरडत विव्हळत पडली असल्याचे त्यांना दिसून आले. या बघणाºयांमध्ये त्या पीडित मुलीचे वडीलही होते. त्यांनी तिला ओळखले व घरी घेऊन गेले. घरी गेल्यावर मुलीला प्रचंड त्रास होतोय म्हणून आरोग्य केंद्रात घेऊन गेले. या ठिकाणी प्राथमिक तपासणीत मुलीवर अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर तिला पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. सहायक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख हे पुढील तपास करीत आहेत.