सातारा : लग्नाचे आमिष दाखवून २३ वर्षीय परिचारिकेवर वारंवार अत्याचार केल्याची खळबळजनक घटना साताऱ्यात घडली असून या प्रकरणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका युवकावर तसेच युवतीला धमकावल्याप्रकरणी त्याच्या दोन नातेवाइकांवरही सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
महेश सदानंद धुरी (वय २४, रा. धोलकरवाडी वस्ती, माणगाव, ता. कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, साताऱ्यातील एका खासगी रुग्णालयांमध्ये २३ वर्षीय युवती परिचारिका म्हणून काम करत आहे. तिची ओळख महेश धुरी या युवकासोबत झाली. माझे तुझ्यावर प्रेम आहे, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे, असे सांगत नोव्हेंबर २०१९ पासून वारंवार युवतीवर त्याने अत्याचार केला.
यानंतर तो त्याच्या मूळ गावी मानगाव, ता. कुडाळ येथे निघून गेला. यानंतर पीडित महिलेने त्यास फोन करून सातारा येथे कोर्ट मॅरेज करूया, असे सांगितले असता त्याने लग्नास नकार दिला व माझ्या आशेवर बसू नको, असे सांगितले. त्यानंतर महेश धुरी याच्या घरातले दोन नातेवाइकांनीही त्या युवतीला दमदाटी केली. या प्रकाराला कंटाळून अखेर युवतीने सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.