सातारा : माढा लोकसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून, एकूण ३२ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये सातारा जिल्ह्यातील १० जणांचा समावेश आहे. राजकीय पक्षाकडून चौघे जण, तर अपक्ष म्हणून ६ जण रिंगणात आहेत. उर्वरित २२ उमेदवार सोलापूर जिल्ह्यातील आहेत.माढा लोकसभा मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील माढा, माळशिरस, करमाळा आणि सांगोला तर सातारा जिल्ह्यातील माण आणि फलटण असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. त्यामुळे माढ्याच्या निवडणूक मैदानात सातारा तसेच सोलापूर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारी अर्ज दाखल करतात. आताही या निवडणुकीत दोन्ही जिल्ह्यांतील उमेदवार आहेत. या निवडणुकीचे राजकीय चित्र सोमवारी स्पष्ट झाले. त्यानुसार यावर्षी रणांगणात ३२ जण राहिले आहेत.सातारा जिल्ह्यातील १० जण माढा लोकसभा निवडणुकीच्या मैदानात आहेत. यामध्ये भाजपकडून विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचा समोवश आहे. त्याचबरोबर बसपाकडून स्वरूपकुमार जानकर, स्वराज्य सेना (महाराष्ट्र) कडून सत्यवान ओंबासे तर रिपाइं (ए) च्या वतीने संतोष बिचुकले निवडणूक लढवत आहेत. खासदार रणजितसिंह हे फलटणचे असून जानकर हे माण तालुक्यातील पळसावडे गावचे तर ओंबासे माणमधीलच वडगावचे आहेत,तर बिचुकले फलटणचे रहिवासी आहेत. हे चौघे जण राजकीय पक्षाचे उमेदवार आहेत, तर इतर ६ जण अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेत. गोंदवले खुर्द, ता. माण येथील अनिल शेडगे, फलटणमधील अमोल करडे, शिंदी बुद्रुक, ता. माण येथील संदीप खरात, माण तालुक्यातील पळसावडे येथील नानासाहेब यादव, वळई, ता. माण येथील नारायण काळेल, फलटणमधील नंदू मोरे या अपक्षांचा समावेश आहे.
मागील वेळी सातारकर विजयी..माढा लोकसभा मतदारसंघाची आताची चौथी निवडणूक होत आहे. २००९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बाजी मारली होती. पवार हे पुणे जिल्ह्यातील, तर २०१४ च्या निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील अकलूजचे आणि राष्ट्रवादीचे विजयसिंह मोहिते-पाटील यांचा विजय झालेला, तर २०१९ च्या निवडणुकीत सातारा जिल्ह्यातील फलटणच्या रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे विजयी झाले होते. आता माढ्याच्या रिंगणात ३२ जण असले तरी खरी लढत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सोलापूरचे धैर्यशील मोहिते-पाटील आणि भाजपचे साताऱ्याचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यात आहे.