हणमंत यादवचाफळ: पाटण तालुक्याच्या चाफळ विभागातील सडावाघापूर येथील (रिव्हर्स वाँटर) उलटा धबधबा अल्पावधीच प्रसिध्द झाला आहे. येथील निसर्गरम्य वातावरण अन् उलट्या धबधब्याचा आनंद घेण्यासाठी गेल्या काही दिवसापासून पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. मात्र आता याठिकाणी आनंद घेण्यासाठी पर्यटकांना पैसे मोजावे लागणार आहेत.या परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी पर्यटन शुल्क आकारण्याचा निर्णय सडावाघापूर येथील संयुक्त वनव्यवस्थापन समितीने घेतला आहे. त्यामुळे पर्यटकांना आता प्रत्येक माणसी वीस रुपये मोजावे लागणार आहेत.चाफळ विभागाच्या पश्चिमेला उंच डोंगर माथ्यावर निसर्गाने मुक्त उधळन केलेले सडावाघापूर पठार आहे. या पठारावरुन धबधबा कोसळतो. धबधब्याचे हेच पाणी पुन्हा उलट्या दिशेने येते असल्याने पर्यटक याचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी याठिकाणी गर्दी करत आहेत. शनिवार, रविवारी सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. यामुळे स्थानिकांनाही रोजगार निर्माण झाला आहे.पर्यटकांची वाढती गर्दी पाहता वनविभाग, सडावाघापूर ग्रामपंचायत व संयुक्त वनव्यवस्थापन समितीने या परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी येथे येणाऱ्या पर्यटकांना पर्यटन शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. दोन दिवसापासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. मात्र या शुल्काबरोबर पर्यटकांना सुविधा देणेही गरजेचे असल्याचे मत पर्यटकांनी व्यक्त केले आहे.
धबधब्याकडे जाणाऱ्या रस्त्याची ग्रामपंचायतीने व वनव्यवस्थापन समितीने डागडुजी केली आहे. मिळणाऱ्या कराच्या रक्कमेतुन या परिसराचा सर्वांगीण विकास साधला जाणार आहे. यासाठी पर्यटकांनी सहकार्य करण्याचे आवाहन ग्रामपंचायतीने केले आहे.धबधबा परिसराच्या विकासासाठी सरपंच अनिता बापू दंडिले व वनव्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी कंबर कसली आहे.. पर्यटन शुल्क आकारुन या परिसराचा विकास करण्याचा निर्णय बैठकीत एकमताने घेण्यात आला. याची दोन दिवसापासून अंमलबजावणी करण्यात येत आहे. विशेष म्हणजे पर्यटकही यासाठी सहकार्य करत आहेत.