खंडाळा : मुंबईहून महाबळेश्वरला फिरायला निघालेल्या पर्यटकांची जीप खंबाटकी घाटात सुमारे दोनशे फूट खोल दरीत कोसळली. यामध्ये एकाच कुटुंबातील सहाजण जखमी झाले आहेत. दरीत असलेल्या दाट झाडीतून जीप अडथळे घेत खाली गेल्यामुळे मोठा अनर्थ टळला. हा अपघात आज, सोमवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास झाला. याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई येथील हलाई कुटुंबीय जीप (एमएच ०३ झेड २००४) मधून महाबळेश्वरला फिरायला निघाले होते. त्यांची गाडी पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाटात आली असता, मध्यावरील उजव्या बाजूच्या वळणावर चालकाचा जीपवरील ताबा सुटल्याने संरक्षक कठड्यातून सरळ दोनशे फूट खोल दरीत कोसळली. यामध्ये साद नूरमहंमद हलाई (वय ३१), राविया साद हलाई (२९), युसूफ साद हलाई (९), हसन साद हलाई (४), हमना साद हलाई (१) व साफिया हस्तेखान पठाण (१०, सर्व रा. जास्मिन अपार्टमेंट, अंधेरी पश्चिम, मुंबई) हे जखमी झाले. यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर शिरवळ येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरीत असलेल्या दाट झाडीतून जीप अडथळे घेत खाली गेली. दाट झाडीमुळे मोठा अनर्थ टळला.खोल दरीत जीप कोसळल्यानंतर महामार्गावरून जाणाऱ्या इतर प्रवाशांनी त्यांना मदत केली. जखमी अवस्थेत सर्वजण दरीतून वर चालत आले. घटनेची माहिती मिळताच खंडाळा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. क्रेनच्या साह्याने कार वर काढण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. या अपघाताची नोंद खंडाळा पोलीस ठाण्यात झाली आहे. (प्रतिनिधी)
पर्यटकांची गाडी दोनशे फूट दरीत!
By admin | Published: December 23, 2014 12:32 AM