लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : लागून आलेल्या सुटीचा आनंद मिळविण्यासाठी देश-परदेशातील पर्यटकांची पावले आपोआपच साताºयाकडे वळली. स्वातंत्र्यदिनी तर कास, बामणोली, ठोसेघर, सज्जनगड, चाळकेवाडी या ठिकाणांवर पर्यटकांची तोबा गर्दी पाहायला मिळाली. कास पठारावरील फुलांचा बहर सुरू होण्याच्या बेतावर असला तरी इथला मोहक निसर्ग खुणावत असल्याने पर्यटक मोठ्या संख्येने वाहने घेऊन दाखल होऊ लागले आहेत.विस्तृत पठारावर पसरलेली गर्द हिरवळ, ठिकठिकाणी फुललेले रानफुलांचे ताटवे, रस्त्याच्या कडेला कोसळणारे छोटे-मोठे धबधबे, अधूनमधून पडणाºया पावसाच्या सरी अन् दाट धुके हे काल्पनिक नव्हे तर कास पुष्प पठारावरील वास्तव मनोमोहक दृश्य. आपल्या सौंदर्याने जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान पटकावलेल्या कास पठाराला स्वातंत्र्यदिनी पर्यटकांचा बहर आला. दरम्यान फुलांचा बहर मात्र जेमतेमच आहे.जैवविविधतेने नटलेल्या कास पठारावर फुलांचा हंगाम सुरू होण्याच्या मार्गावर असून, राज्यभरातून पर्यटक मोठ्या संख्येने पर्यटनास येत आहेत. शनिवार, रविवार सुटीच्या दिवशी कासला पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. रिमझिम पावसात भिजण्याबरोबरच पर्यटक कौटुंबिक सहलीचे क्षण कॅमेºयात टिपून ठेवत होते. पठारावर विविध प्रकारची फुले फुलू लागली आहेत. चारचाकी, दुचाकी वाहनांच्या मोठ्या प्रमाणावर रांगा लागल्या होत्या.सध्या पठारावर वायतुरा, पाचगणी आमरी, कापरू, टुथ ब्रश, दीपकांडी, रान महुरी, सीतेची आसवे, रानवांगे तुरळक तर पंद, गेंद, चवर, कापरू फुलांना चांगला बहर आला असून, अशी सात ते आठ प्रकारची फुले फुलली आहेत. गेंद मोठ्या प्रमाणावर बहरण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे हा परिसर मनमोहक बनू लागला आहे.पठारावर देखरेख व मार्गदर्शनासाठी वनविभागाचे कर्मचारी तसेच कास, कासाणी, आटाळी, एकीव, पाटेघर, कुसुंबीमुरा, या सहा गावची कार्यकारिणी समिती कास पठार संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे कर्मचारी उपस्थित होते.अधूनमधून पावसाला सुरुवात होत असल्याने जलधारा अंगावर झेलत हिरवळीवरून भटकंती करताना पर्यटक दिसत होते. दरम्यान पठारावर फुलांचा जेमतेम बहर असल्याने पर्यटकांच्या वाहनांचा ताफा कास तलावाकडे वळला होता. कास तलावावर बहुसंख्येने पर्यटकांनी गर्दी करत, जलविहाराचा आनंद लुटत खरपूस कणसांवर तसेच मसालेदार काकडी खाण्यावर भर दिला. तसेच कित्येक पर्यटक सेल्फी स्टीकद्वारे फोटोसेशन करण्यात मग्न झाले होते. बालचमूंनीही आनंद लुटला.सज्जनगडावर पर्यटनाचा आनंदसज्जनगडावर समर्थ समाधीचे दर्शन घेण्यासाठी मंगळवारी रांगा लागल्या होत्या. तर उरमोडी धरणाचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी पर्यटक वळले होते. धरणाचे विहंगम दृश्य मोबाईमध्ये टिपण्यासह सेल्फी काढण्याचा मोहही अनेकांना आवरला नाही. सज्जनगडावर ऊन पावसाचा खेळ पाहायला मिळत होता. लोखंडी संरक्षण पाईपला खेटून पर्यटक फोटो काढत होते.स्वातंत्र्यदिनी पोलिसांची तपासणीस्वातंत्र्यदिनी हजारो पर्यटक कास पठाराला भेट देत असतात. या पार्श्वभूमीवर मंगळवारी पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी यवतेश्वर परिसरात बॅरिगेटस लावून पोलिस पथकाने वाहनांची कसून चौकशी केली.गेंद : हिरव्या रंगाच्या गवतासारख्या देठाला गोलाकार आकाराचे पांढरे फूल. उन्हामध्ये हिºयासारखे चमकतात.निसरड्या रस्त्यावरुन सावध पाऊलठोसेघर धबधब्याकडे जाणारा रस्ता पावसामुळे निसरडा झाला असल्याने पर्यटक अत्यंत सावधपणे जाताना पाहायला मिळत होते. अनेक जण निसरड्या वाटेवरुन पडताना पाहायला मिळत होते. लहान मुलेही घसरुन पडत होती.हिरव्या पार्श्वभूमीवर फोटोसेशनठोसेघर धबधब्याच्या भोवती असणाºया काळा पाषाण हिरव्या गवताच्या मागे झाकून गेला आहे. या हिरव्या पार्श्वभूमीवर तसेच ठोसेघर धबधबा कॅमेराबध्द होईल, अशा तºहेने पर्यटक फोटो काढत होते.
कास, ठोसेघरला फुलांसोबत पर्यटकांचा बहर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 11:31 PM