पाचगणी : प्रवास करण्याबाबत निर्बंध असतानाही पाचगणी येथे विना ई-पास दाखल झालेल्या पर्यटकांवर पाचगणी पोलीस व पालिकेच्या पथकाने दंडात्मक कारवाई केली. त्यांना एक तासात पाचगणी सोडण्याचे फर्मान प्रशासनाने सोडले आहे. जिल्ह्यात कोरोनाच्या उद्रेकामुळे जिल्हाबंदी लागू केली आहे. तरीही शहरात चोरीछुपे पर्यटक दाखल होत असल्याने पाचगणीकरांची चिंता वाढली आहे.
याबाबत पाचगणी पोलीस व पाचगणी पालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाचगणी येथे गुरुवारी रात्री गाडी (एमएच ०१ डीबी ०७३७), (एमएच ०१ डीके ४५५८) व गाडी (टीएस ०९ ईयू ८) हे नंबर असलेल्या तीन गाड्यांमधून अकरा प्रवासी दाखल झाले होते. हे सर्वजण विना ई-पास आल्याने त्यांच्यावर पाचगणी पोलिसांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली. त्यांच्याकडून चार हजार रुपयांचा दंड वसूल केला. त्यानंतरही ते पर्यटक पाचगणी येथील दिल्ली दरबार हॉटेलवर गेले. सकाळी त्यांच्यावर पाचगणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कारवाई करून सहा हजार रुपयांचा दंड केला आणि एका तासात शहर सोडा अन्यथा गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी तंबी दिली.
नगरपालिकेने केलेल्या कारवाई पथकात सूर्यकांत कासुर्डे, बाबू झाडे, आबू डांगे, सागर बगाडे, अफजल डांगे, विशाल स्वामी, लालू क्षीरसागर, आकाश वन्ने यांनी सहभाग घेतला. पाचगणी या थंड हवेच्या पर्यटन स्थळावर सध्या कोरोनामुळे पूर्ण जनजीवन ठप्प झाले आहे. शासनाने कडक निर्बंध घातले असून, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पाचगणी नगरपालिका, पोलीस आणि आरोग्य विभाग आटोकाट प्रयत्न करत आहे. शहरात विनाकारण फिरणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यात येत आहे. शहरात कडक लॉकडाऊन पाळण्यात येत असताना, बाहेरून येणाऱ्या प्रवाशांमुळे कोरोना रोखण्यात अडचणी येतील.
चौकट
प्रवेश मिळवला हे विशेष
जिल्ह्यात कडक लॉकडाऊन असताना मुंबईवरून आलेल्या तिन्ही पर्यटक गाड्या जिल्हा प्रवेशद्वारावरून कशा आल्या, हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. या पर्यटक गाड्यांना प्रवेश देणाऱ्या प्रशासनातील अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा जिल्हा प्रशासन उगारणार का, असा प्रश्न विचारला जात आहे.
चौकट :
रात्री नाकाबंदीत प्रथम विनापरवाना प्रवास केल्याबद्दल पोलिसांनी चार हजार रुपयांची दंडात्मक तर सकाळी पालिकेच्या भरारी पथकाने हॉटेलवर जाऊन सहा हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली.