पाटण : तालुक्यातील कोयनानगर येथे असणारे नेहरू उद्यान हे विभागातील पर्यटकांचे एकमेव आकर्षण आहे. हे उद्यान सद्या कोयना सिंचन मंडळाकडून चालविले जाते. या उद्यानात नेहमीच पर्यटक व लहान मुलांची गर्दी असते. तसेच उद्यानात प्रत्येकी वीस रुपये शुल्क आकारले जाते. मात्र, काही महिन्यांपासून या उद्यानातील स्वच्छता आणि देखभालीकडे दुर्लक्ष केले जात असून, उद्यानात गेल्यावर जागोजागी कचऱ्याचे ढीग आणि वस्तूंची मोडतोड झाल्याचे निदर्शनास येते.
कोयना धरणाचा नजारा पाहायचा असेल तर येथील नेहरू उद्यानासारख्या उंच ठिकाणावर जाण्याशिवाय पर्याय उरत नाही. त्यामुळे कोयनानगर येथे गेलेल्या पर्यटकांना नेहरू उद्यान नेहमीच भुरळ घालते. गत अनेक वर्षांपासून या उद्यानाची देखभाल आणि व्यवस्था धरण व्यवस्थापनाकडून केली जाते. दरवर्षी १४ नोव्हेंबर रोजी याच उद्यानात जवाहरलाल नेहरू यांच्या स्मृतिदिनानिमित्त बालदिन म्हणून साजरा करण्यासाठी परिसरातील शालेय मुलांना उद्यानात आणले जाते.
कोरोना साथीच्या प्रादुर्भावानंतर आणि लॉकडाऊनच्या कालावधीनंतर नेहरू उद्यानाकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. या नेहरू उद्यानाची दुरुस्ती करण्यासाठी सध्या निधीची गरज आहे. मात्र, आजअखेर तसा निधी मिळालेला नसल्याचे समजते. नेहरू उद्यानात गेल्यावर धरणाच्या निर्मितीवेळची चित्रफीत पाहण्याची खास व्यवस्था आहे. तीसुद्धा अलीकडच्या काळात बंद झाल्याचे समजते. तसेच विविध कारंजे आणि धरणाच्या पाणलोट क्षेत्राचा नजारा पाहावयास मिळतो.
- चौकट
कोयनानगर येथील नेहरू उद्यानाची देखभाल करण्याचे कंत्राट आणि त्यासाठी लागणारा निधी याचे नवीन टेंडर काढलेले आहे. आचारसंहिता आणि इतर अडचणीमुळे त्याला थोडा विलंब लागत आहे. येत्या काही दिवसांतच नेहरू उद्यानाचे नवीन टेंडर काढून देखभाल व्यवस्था अजूनही चांगल्या पद्धतीने करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
- वैभव फाळके
प्रभारी कार्यकारी अभियंता
- चौकट
झाडांची पाने, प्लास्टिक कागदासह बाटल्यांचा खच
उद्यानात झाडांची संख्या जास्त आहे. सध्या पानगळतीमुळे झाडांची पाने मोठ्या प्रमाणावर गळत असून, उद्यानात त्यांचा खच पडल्याचे दिसून येत आहे. तसेच पर्यटकांकडून टाकली जाणारी खाऊच्या पुड्यांची प्लास्टिक रॅपर व बाटल्याही येथे मोठ्या प्रमाणावर पडल्या आहेत. उद्यानात कचराकुंडी आहे. मात्र, कुंडीभोवतीच कचऱ्याचे कोंडाळ निर्माण होत आहे.
फोटो : २१केआरडी०३
कॅप्शन : कोयनानगर येथील नेहरू उद्यानात मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.
फोटो : २१केआरडी०४
कॅप्शन : उद्यान पाहण्यासाठी पर्यटकांना प्रत्येकी वीस रुपये आकारले जातात.