पेट्री : सातारा-कास-बामणोली मार्गावर यवतेश्वर घाटातील वानरसेनेसह या मार्गावर अनेक वन्यजीव सर्रास रस्ता ओलांडतानाचे चित्र दिसत असून, भरधाव वाहनाची धडक वन्यजीवाला बसून अपघाताची विपरीत घटना घडू नये, यासाठी वाहनचालकांनी आपापल्या वाहनांच्या वेगावर मर्यादा घालणे आवश्यक आहे.
परिसरात वन्यप्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर असल्याने हॉर्न वाजवणे, विचित्र आवाजात ओरडणे, वेगाने वाहने चालवणे आदी विघातक बाबी वन्यजीवांना धोका पोहोचवणाऱ्या असून, विवेकबुद्धीने पर्यटन करणे महत्त्वपूर्ण आहे. सातारा-कास मार्गावरील यवतेश्वर घाटात मुख्य रस्त्याच्या अलीकडे पलीकडे सतत वानरांची ये-जा सुरू असते. कधी कधी तर रस्त्याच्या मधोमधच बसून त्यांची मर्कटलीला सुरू असते. घाटातून साताऱ्याकडे तीव्र उतारावर काहीजण आपल्या वाहनांना आउट ऑफ मारत असतात. एखादा वन्यजीव समोर आल्यास वाहनावर नियंत्रण ठेवणे अवघड होऊन धडक बसून दुखापत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच कास-बामणोली मार्गावरदेखील अनेकदा वन्यजीव मुख्य रस्ता ओलांडताना पाहावयास मिळतात. हा मार्ग घाटरस्ता, तीव्र चढ-उतार वळणावळणाचा असल्याने रात्रीसह दिवसादेखील अंदाज न आल्याने एखाद्या अपघाताचा संभव अधिक असून, यासंदर्भात काळजी घेऊन वाहनचालकांनी वाहनांच्या वेगावर मर्यादा घालणे आवश्यक आहे.
अनेक वन्यजीव अन्न, पाण्याच्या शोधात इकडून तिकडे भ्रमंती करतात. स्टंट, हुल्लडबाजी करून वाहन चालवणाऱ्यांकडून या मार्गावरील वन्यजीवांना धोका उद् भवू शकतो. आपल्या एका चुकीमुळे या वन्य पशुपक्ष्यांना नाहक जीव गमवावा लागू नये, यासाठी विवेकीपणातून वाहने काळजीपूर्वक चालवणे महत्त्वाचे आहे. यापूर्वी सातारा-कास मार्गावर बऱ्याचदा सरपटणारे प्राणी, वानरांना मनुष्याच्या बेजबाबदार वाहन चालविल्याने आपला जीव गमवावा लागला आहे.
(कोट)
सातारा-कास-बामणोली हा सततच्या रहदारीचा मार्ग आहे. या मार्गावर बहुंताशी तरुणाईच्या स्टंट व हुल्लडबाजीच्या बेजबाबदार ड्रायव्हिंग तसेच वेगाची मर्यादा जास्त असल्यामुळे रस्त्यावर येणाऱ्या मुक्या जिवांना दुखापत होऊन आपला प्राण गमवावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
-अभिषेक शेलार, कास पठार कार्यकारी समिती, कर्मचारी
(चौकट)
सातारा-कास-बामणोली मार्गावर नेहमीच वन्यजीवांचा मुक्तसंचार असतो. भेकर, रानडुक्कर, रानगवे, ससे, रानकोंबड्या, साळिंदर, मोर, घोरपड अन्य सरपटणारे प्राणी यासारखे वन्यजीव निर्भिडपणे रस्त्याच्या आसपास, रस्त्याच्या एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे सहज संचार करू लागल्याने वन्यजीवांना त्यांचे जीवन जगत असताना कोणताही अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता मानवाने घेणे महत्त्वाचे आहे.
फोटो ०३पेट्री
कास-अंधारी मार्गावर चोहोबाजूला दाट जंगल परिसर असून, सायंकाळी मुख्य रस्ता ओलांडताना महाकाय गवे पहायला मिळतात.