महाबळेश्वर : महाबळेश्वरमध्ये नाताळ हंगाम, तसेच सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी लाखो पर्यटक महाबळेश्वरमध्ये दाखल झाले होते. मात्र शासनाने निर्बंध घातल्याने नेहमीप्रमाणे रात्री उशिरापर्यंत पार्टी साजरी करता आली नाही. त्यातच शुक्रवारी ढगाळ वातावरण असल्याने नववर्षातील पहिल्या सूर्योदयाचा क्षणही हुकला. चार दिवस पर्यटनाचा आनंद लुटून पर्यटक परतले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने ३१ डिसेंबरला रात्री अकरानंतर कोणतेही कार्यक्रम सुरू ठेवण्यास मनाई केली होती. त्यामुळे पर्यटक, स्थानिक व्यापारी-व्यावसायिक, हॉटेल व्यावसायिकांमधून नाराजी व्यक्त होत होती. नववर्षातील पहिल्या दिवसाचा सूर्योदय पाहण्यास विल्सन पॉईंट येथे पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. परंतु सकाळी विल्सन पॉईंटवर धुक्याची चादर पसरली होती. त्यात गुलाबी थंडीचा आनंद पर्यटक मनमुरादपणे घेत होते. पण सकाळी धुके व ढगाळ वातावरण असल्यामुळे सूर्योदय पर्यटकांना पाहता आला नाही.
महाबळेश्वरमध्ये सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी नाताळपासून हजारोच्या संख्येने पर्यटक वाहनांनी दाखल झाले होते. काही पर्यटक नाताळ झाल्यावर आपापल्या गावी गेले. काही पर्यटकांचे हाॅटेल बुकिंग १ जानेवारीपर्यंत असल्यामुळे शुक्रवारी दुपारपासून महाबळेश्वर-पाचगणी रस्त्याला परतीच्या मार्गे जाणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागल्या होत्या.
चौकट :
महाबळेश्वरमध्ये ३१ डिसेंबरला सकाळपासून मुख्य बाजारपेठ, पर्यटनस्थळ, हाॅटेलमध्ये पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. काही हाॅटेलमध्ये कमी वेळ दिल्यामुळे ॲाफर दिल्या होत्या, तर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार असल्यामुळे बहुतेक जणांनी शाहाकारी जेवणावर ताव मारला.
महाबळेश्वर नगरपालिकेकडून सकाळपासून वारंवार रात्री दहा वाजता हाॅटेल, दुकाने बंद करण्याबाबत ध्वनिक्षेपकाद्वारे सूचना केल्या जात होत्या. रात्री मुख्य बाजारपेठ दहा वाजता बंद करण्यात आली. तेव्हा पोलिसांकडूनही वारंवार सूचना देण्यात येत होत्या. १ जानेवारीला शुक्रवारी तीन वाजल्यापासून शहर परिसरात व मुख्य बाजारपेठेमध्ये तुरळक पर्यटक दिसून येत होते.
फोटो
०१महाबळेश्वर०१
नववर्षाचे स्वागत करण्यासाठी महाबळेश्वरमध्ये दाखल झालेले पर्यटक शुक्रवारी परतीच्या प्रवासाला लागले. (छाया : अजित जाधव)