पेट्री : जागतिक वारसास्थळात समावेश झालेल्या कास पठारावर विविधरंगी फुलांचा हंगाम सुरू झाल्याने देश-विदेशातील पर्यटकांची पावले कासकडे वळू लागली आहेत. शनिवार, रविवार सलग सुटीच्या दिवशी पर्यटक मोठ्या संख्येने पुष्प पठाराला भेटी देत आहेत. सध्या फुलांसाठी पोषक वातावरण असल्याने पठारावर फुलांचा रंगोत्सव पाहावयास मिळत आहे.
पठारावरील गेंद, सीतेची आसवे, तेरडा या फुलांना चांगल्या प्रकारे बहर आला असून, ठिकठिकाणी गालिचे पाहावयास मिळत आहेत. तर अबोलिमा, अभाळी, नभाळी आदी तीस ते चाळीस प्रकारच्या फुलांना हळूहळू बहर येऊ लागला आहे. गेल्या आठ दिवसांमध्ये हजारो पर्यटकांनी कासला भेट देऊन येथील निसर्गसौंदर्याचा मनमुराद आनंद लुटला.
चवर, टूथब्रश, कापरू, पंद, भुईचक्र, अभाळी तेरडा, सीतेची आसवे आदी विविधरंगी फुलांनी बहरलेले पठार सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. पठारावरील नयनरम्य सुंदर फुलांना पाहण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक कासला भेटी देत आहेत. पठारावर एकूण १३२ प्रकारची विविधरंगी तसेच दुर्मीळ फुले बहरतात. सध्या जांभळ्या, लाल व पांढऱ्या रंगाची छटा पर्यटकांना दिसण्यास सुरुवात झाली आहे. फुलोत्सवासह चोहोबाजूला हिरवागार निसर्ग, पावसाची संततधार, गुलाबी थंडी अन् दाट धुके निसर्गाचा असा अनोखा नजराना पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करू लागला आहे.
दरम्यान, नौकाविहारासाठी प्रसिद्ध असलेल्या बामणोली परिसरालाही पर्यटक मोठ्या संख्येने भेटी देत आहेत. शिवसागर जलाशयात निसर्गाच्या सानिध्यात नौकाविहार करण्यासाठी पर्यटकांनी गर्दी होत असून, पर्यटक याचा मनमुराद आनंद लुटत आहेत.पोषक वातावरण...फुले उमलण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याने पठारावर दुर्मीळ फुले बहरू लागली आहेत. फुले पाहत असताना फुलांचे नुकसान होणार नाही, याची दक्षता पर्यटकांनी घ्यावी. आम्हाला सहकार्य करून फुलांचे सौंदर्य टिकवावे. सध्या पठारावर गेंद, तेरडा, सीतेची आसवे आदी फुले मोठ्या प्रमाणावर फुलली आहेत. ठिकठिकाणी विविधरंगी गालिचे फुलले आहेत, अशी माहिती कास पठार कार्यकारिणी समितीचे अध्यक्ष सोमनाथ जाधव यांनी दिली.